
गत हंगामात तुटलेल्या उसाला प्रति टन ४०० रुपये दुसरा हप्ता द्यावा, सर्वच साखर कारखान्यांनी वजन काटे डिजिटल करावेत, आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रोश पदयात्रेची सुरुवात शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सुरू केली. या यात्रेस शिरोळ व परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शिरोळ : गत हंगामात तुटलेल्या उसाला प्रति टन ४०० रुपये दुसरा हप्ता द्यावा, सर्वच साखर कारखान्यांनी वजन काटे डिजिटल करावेत, आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रोश पदयात्रेची सुरुवात शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सुरू केली. या यात्रेस शिरोळ व परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
दरम्यान शिरोळच्या शिवाजी चौकात झालेल्या जाहीर सभेत ४०० रुपयाचा दुसरा हप्ता व ऊस वजन काटे डिजिटल केल्याशिवाय उसाच्या कांड्याला हात लावू देणार नाही. साखर बाहेर सोडणार नाही, असा असा निर्वाणीचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. सकाळी नऊ वाजता श्री दत्त साखर कारखाना प्रशासन व अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देऊन आक्रोश पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. तहसीलदार कार्यालयापासून संभाजी चौकात पदयात्रा आली.
शेतकरी व कार्यकर्त्यांनी जल्लोषपूर्ण स्वागत केले. शिरटी येथील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जेसीबी मशीनच्या सहाय्याने खासदार राजू शेट्टी यांच्या पदयात्रेवर प्रचंड फुलाचा वर्षाव केला. नगरपालिका चौकात नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आक्रोश पदयात्रेचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. या पदयात्रेत माजी बांधकाम सभापती सावकार, पंचायत समितीचे सभापती सचिन शिंदे, सुभाष मगदूम, अशोक चौगुले, विश्वास बालीघाटे, आय. आय. पटेल, अजित दानोळ, शिरटी माजी सरपंच राहुल सूर्यवंशी, सतीश चौगुले, आलम मुलानी, प्रकाश माळी, पिंटू गुरव अादी सहभागी झाले होते.
उसाला हात लावू देणार नाही
शिवाजी चौकात झालेल्या जाहीर सभेत खासदार राजू शेट्टी यांनी ३७ साखर कारखान्यांकडून बाराशे कोटी रुपये जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाहीत, तोपर्यंत उसाच्या कांडाला हात लावू देणार नाही व साखर बाहेर विक्रीसाठी दिली जाऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. नंतर आक्रोश पदयात्रा कुरुंदवाडकडे रवाना झाली.
कार्यकर्त्यांवर फुलांचा वर्षाव
दरम्यान शिरटी फाटा नरसिंहवाडी फाटा येथे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आक्रोश पदयात्रेचे जोरदार स्वागत करून पाठिंबाही व्यक्त केला. शिरोळ ते कुरुंदवाड दरम्यान असणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतकरी व स्वाभिमानीचे कार्यकर्ते दुतर्फा उपस्थित राहून पदयात्रेत सामील झालेल्या कार्यकर्त्यांवर फुलांचा वर्षाव करीत होते.