
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तत्परता व पुणे पोलिसांची सतर्कतेने पुण्यातील होतकरू व्यावसायिक तरुणाचे प्राण वाचले आहेत. पोलिसांनी केवळ १५ मिनिटांत त्या तरुणाचा तांत्रिक विश्लेषणातून शोध घेऊन त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. फक्त परावृत्त न करता त्याला एक नवी उमेद देऊन आम्ही तुझ्यासोबत असल्याचा विश्वास देखील दिला. पोलिसांच्या या तत्परतेने तरुणाच्या कुटूंबियांनी पुणे पोलिसांचे भरल्या डोळ्यांनी आभार मानले.
अक्षय फाटक, पुणे : उपमुख्यमंत्र्यांची तत्परता दाखवली अन् पुणे पोलिसांच्या सतर्कतेने एका तरुण व्यावसायिकाच्या प्राण वाचले आहेत. पुण्यातील व्यावसायिक तरुणाला आत्महत्येपासून केले परावृत्त केले आहे. उपमुख्यमंत्र्यांना मॅसेज आला अन् त्यांनी तत्काळ यंत्रणा हलवत या तरुणाचे प्राण वाचवले आहेत. केवळ अर्ध्या तासात पोलिसांनी शोध घेऊन त्याचे केले काऊन्सलिंग करून त्याला कर्जापासून परावृत्त केले.व्यावसायात कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करण्याचा विचार..!
त्याच झाल असे, दत्तवाडीतील ३४ वर्षीय अमितने मी आत्महत्या करत आहे. त्यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असा मॅसेज त्याच्या मित्राला पाठविला. तो मित्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ओळखीतील होता. त्याने हा मॅसेज तत्काळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविला. योगायोगाने उपमुख्यमंत्री पुणे दौऱ्यावरच होते. त्यांनी तत्काळ हा मॅसेज पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना पाठविला अन् संबंधिताला वाचविण्याबाबत सांगितले. पोलीस आयुक्तांनी याची दखल घेत ही माहिती पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांना दिली.
उपायुक्त अमोल झेंडे यांनी घटनेचे गांर्भिय ओळखत संबंधित क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले. क्षणात पोलिसांना क्रमांक दत्तवाडी परिसरात असल्याचे समजले. सायबर पोलीस व गुन्हे शाखेने त्याठिकाणी धाव घेत दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मदतीने संबंधित तरुणाचा शोध घेतला. केवळ १५ मिनिटांत पोलीस तरुणापर्यंत पोहचण्यास यशस्वी झाले. तेव्हा तरुण अगदीच निराश अवस्थेत दिसून आले. पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणले. त्याला विचारपूस करत धीर दिला. आत्महत्याकरून कुटूंब उघड्यावर येईल, याची कल्पना देत त्याला व्यावसायातील कर्ज फेडता येईल, याची जाणीवकरून दिली. त्याचे मनपरावृत्त करत पोलिसांनी त्याला आत्महत्येपासून दूर केलेच पण जगण्याची एक नवी उमेद देखील दिली.
संबंधित तरुण विवाहित असून, एक मुलगा देखील आहे. तो पत्नी, मुलगा आणि आई यांच्यासोबत राहतो. पोलिसांनी या तरुणाच्या कुटूंबाला बोलवून त्यांनाही याची कल्पना दिली. पोलिसांनी काऊन्सलिंग केल्यानंतर तरुणाच्या कुटूंबाने त्याचे आभार मानले.
अत्यंत होतकरू तरुण नैराश्याच्या गर्देत..!
पोलिसांनी आत्महत्येपासून परावृत्त केलेला तरुण हा अत्यंत होतकरू आहे. सहा वर्षांपुर्वीच त्याने व्यावसायात पर्दापण केले आहे. त्याचा व्यावसाय देखील चांगला सुरू होता. पण, अचानक कोरोना आला अन् व्यावसायात अडचणी येऊ लागल्या. दरम्यान, त्याने सहा ते सात जणांकडून दीड कोटींचे कर्ज घेतले होते. व्यावसायातील अडचणीमुळे त्याला हे पैसे देण्यास अडचणी येत होत्या. त्यातून तो नैराश्यात गेला होता. इंटेरिअरला लागणारा माल पुरविण्याचा त्याचा व्यवसाय आहे.