सावधान! आधीच मिळणार अलर्ट, महापालिकेच्या तीन रुग्णालयात बसणार स्मोक डिटेक्टर; महापालिकेकडून होणार सुमारे ‘एवढे’ कोटी रुपये खर्च

महापालिकेच्या रुग्णालयातील ओपीडी, आयसीयू आणि इतर विभागांमध्ये विद्युत वायरिंग असते. त्यामुळे त्यावरील इलेक्ट्रिकच्या वाढत्या लोडमुळे शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगीत निर्माण होणाऱ्या धुरामुळे आता असलेले रुग्ण आणि नागरिकांची प्रकृती अधिकच गंभीर बनते.

    मुंबई : भंडारा रुग्णालयात (Bhandara Hospital) लागलेल्या आगीने मुंबई महापालिकेला खळबळून जाग आली असून महापालिकेने आपल्या तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये स्मोक डिटेक्टर (Smoke Detector) बसवण्याचा निर्णय घेतला आहे.  यासाठी महापालिकेकडून १२.५७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

    केईएम (KEM), नायर (Nair) आणि सायन (Sion) या तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये स्मोक डिटेक्टर बसवणार आहे.  आग लागल्यास स्मोक डिटेक्टर सह, स्मोक एक्झॉस्ट डिव्हाइस असल्याने मुंबई महापालिकेतील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

    महापालिकेच्या रुग्णालयातील ओपीडी, आयसीयू आणि इतर विभागांमध्ये विद्युत वायरिंग असते. त्यामुळे त्यावरील इलेक्ट्रिकच्या वाढत्या लोडमुळे शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगीत निर्माण होणाऱ्या धुरामुळे आता असलेले रुग्ण आणि नागरिकांची प्रकृती अधिकच गंभीर बनते. अशा स्थितीत रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढणे अत्यंत अवघड आहे.

    गुदमरल्यामुळे जीव जाण्याची देखील शक्यता निर्माण होते आणि अग्निशमन दलाला देखील अशा वेळी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. अशा घटना रोखण्यासाठी बीएमसी स्मोक डिटेक्टर सह स्मोक एक्झास्टर बसवणार आहे. रुग्णालयातील इमर्जन्सी वार्ड, आयसीयू, पॅथॉलॉजी विभाग, आरआरसीयू आणि ब्रॉन्कोस्कोपी आणि इतर विभागांमध्ये ही सुविधा बसविण्यात येणार आहे. हा प्लांट आग लागल्यास अलार्म देऊन लोकांना सतर्क करेल आणि आग विझवण्यासही मदत करेल.

    स्मोक डिटेक्टर धूर लगेच ओळखतो. यामुळे लगेच सायरन वाजून अलर्ट सुरू होतो. आगीची सूचना मिळाल्यावर रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढता येते. तसेच आग आटोक्यात आणण्यास मदत होते. तिन्ही रुग्णालयांमध्ये स्मोक डिटेक्टर बसवण्यासाठी महापालिकेला १२ कोटी ५७ लाख १२ हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. मेसर्स मॅक एंटरप्रायझेसला (M/s Mac Enterprises) उपकरणे बसवण्याचे कंत्राट देण्यात आले असल्याचे पालिका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.