अलिबाग जामा मस्जिदमध्ये चोरी करणाऱ्या चोराला तळोजामध्ये पकडले

    अलिबाग : शहरातील जामा मस्जिद मध्ये शिरून तेथील चंदा पेटी चोरी केल्याची घटना गुरुवारी झाली होती. सदर चोराला तळोजा येथील मशिदीत चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अब्दुल्ला अकबर अंबिकापुर असे या चोरट्याचे नाव आहे. हा चोरट्या छत्तीसगड येथे राहणारा आहे.

    अलिबाग शहरातील मुख्य बाजारपेठेत मुस्लिम समाजाच्या प्रार्थना स्थळ असलेल्या आणी रहदारीच्या ठिकाणी असूनही या चोरटयाने आत शिरून तेथे असलेली चंदा पेटी (दान पेटी) उचलून पोबारा केला होता. सदर घटना मशिदीच्या बाहेर असलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती. निळा टी शर्ट असलेला चोरटा मोठ्या पिशवीमध्ये चंदा पेटी घेऊन बाहेर पडत असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर याच चोरट्याने पेण येथील मशिदीमध्ये देखील चोरी केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तो पुढे पनवेल परिसरात मशिदीत चोरी करणार असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.

    त्यानुसार सर्वांना खबरदारी घेण्याविषयी सूचना देण्यात आली होती. त्यानुसार सदर चोरटा पनवेल तालुक्यातील तळोजा येथील मशिदीत चोरी करण्याचा प्रयत्नात होता. मात्र सतर्क असलेल्या मुस्लिम बांधवांनी त्याला रंगेहाथ पकडुन चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या सोबत संपर्क साधला असता त्यांनी दुजोरा देत सदर चोरट्याला अलिबाग पोलीस ठाण्यात आणण्यात येणार असल्याचे सांगितले.