संसद रत्नांनी आम्हाला सल्ला देऊ नये, तटकरेंचा टोला झोंबताच सुप्रिया सुळेंनी उगारले निलंबनाचे हत्यार!

सुप्रिया सुळे यांनी त्यावरची प्रतिक्रिया म्हणून आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पत्र लिहून सुनील तटकरेंच्या निलंबनाची आठवण करून दिली.

    अलिबाग : संसद रत्नांनी आम्हाला सल्ला देण्याच्या फंदात पडू नये, असे खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथील पत्रकार परिषदेत म्हणताच शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी परजले निलंबनाचे हत्यार!, असे आज घडले आहे. मराठा आरक्षण आंदोलनात मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणादरम्यान मराठा आंदोलकांनी सर्वपक्षीय नेत्यांवर गाव बंदी लादली होती, पण त्यातून चतुराईने शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या नेत्यांना वगळले होते. शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे नेते गावोगाव दौरे करतच होते. मराठा आरक्षणासंदर्भात वेगवेगळे तोडगे समोर येत होते. त्याचवेळी मराठा आंदोलन एवढे पेटले की राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची घरे जाळली गेली. त्याचा ठपका खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर ठेवला आणि तो ठपका ठेवताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितनिष्ठ राष्ट्रवादीला देवेंद्र फडणवीसांपासून “सावध” राहण्याचा सल्ला दिला.

    सुप्रिया सुळे यांच्या सावधगिरीच्या सल्ल्याबाबत अजितनिष्ठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना अलिबाग येथील पत्रकार परिषदेत विचारल्यानंतर त्यांनी संसद रत्नांनी आम्हाला सल्ला देण्याच्या फंडात पडू नये. त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले असतील, तर त्याचे उत्तर भाजपचे नेते देतील. ते देशात आणि राज्यात सत्तेवर आहेत. राजकारणात टीका टिप्पणी चालतेच, पण थोडेफार राजकारण आम्हालाही कळते. आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली जी भूमिका घेतली आहे त्यावर ठाम आहोत, असा सुप्रिया सुळे यांना टोला लगावला.

    सुप्रिया सुळे यांनी त्यावरची प्रतिक्रिया म्हणून आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पत्र लिहून सुनील तटकरेंच्या निलंबनाची आठवण करून दिली. सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या लोकसभेतल्या गटनेत्या आहेत. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर ताबडतोब सुनील तटकरे यांचे निलंबन करण्याचे पत्र लोकसभा अध्यक्षांना पाठवले होते पण त्याचा रिमाइंडर गेले ४ महिने पाठवला नव्हता. तो रिमाइंडर त्यांनी ३ नोव्हेंबरला पाठवला आणि त्यात त्यांनी आपण ४ जुलैला सुनील तटकरे यांच्या निलंबनाचा अर्ज केला होता याची आठवण लोकसभा अध्यक्षांना करून दिली, पण त्यातून, संसद रत्नांनी आम्हाला सल्ला देण्याच्या फंदात पडू नये हे सुनील तटकरे यांचे वक्तव्य त्यांना चांगलेच झोंबल्याचे दिसले.