
पुणे पोलिसांच्या (Pune Police) कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित व्हावे असे वातावरण सध्या शहरात पाहिला मिळत असून, मोक्का आणि एमपीडीए व पाहिजे-फरारी आरोपींना पकडणाऱ्या पोलिसांना चक्क बक्षीस देण्याची योजनाच सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील सर्वच गुन्हेगार "वीरप्पन" आहेत का, असा "सवाल" उपस्थित केला जात आहे.
पुणे : पुणे पोलिसांच्या (Pune Police) कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित व्हावे असे वातावरण सध्या शहरात पाहिला मिळत असून, मोक्का आणि एमपीडीए व पाहिजे-फरारी आरोपींना पकडणाऱ्या पोलिसांना चक्क बक्षीस देण्याची योजनाच सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील सर्वच गुन्हेगार “वीरप्पन” आहेत का, असा “सवाल” उपस्थित केला जात असून, पुणे पोलिसांच्या बक्षिस योजनेवर पुणेकर अन् विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी टीका केली आहे. तर, पोलीस दलात देखील उलट-सुलट चर्चा सुरू आहे. एकीकडे आरोपींना पकडण्यासाठी बक्षिस योजनेसारखे “केवीलवाने” प्रयत्न सुरू असताना “मोक्का”तील गुन्हेगारानेच पोलिसांच्या तावडीतून पलायन केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पुण्यातील कोयतेधारी टोळक्याने पुणे दहशतमय केले आहे. वाढत्या गुन्ह्यांनी पुणेकर हैराण अन् पोलीस परेशान झाले आहेत. मिसरूडे फुटलेल्या नवीन गुन्हेगारांनी पोलिसांच्या नाकेनऊ आणत पुणेकरांना दहशतीखाली ठेवले आहे. कोयतेधाऱ्यांना आळा घालण्यास पोलीस अथक प्रयत्न करत आहेत. आता कोयते विक्रेत्यांना कोयते विकताना ग्राहकांची माहिती ठेवावी लागणार आहे. त्यांचे आधार कार्ड व नाव, मोबाईल क्रमांक द्यावा लागणार आहे. त्यातून अल्पवयीन मुले तसेच गुन्हेगारीसाठी कोयते घेऊन जाणाऱ्यांना जरब बसणार आहे. तसेच, पोलिसांकडून अवैधरित्या कोयते विक्रेत्यावर कारवाई केली जात आहे.
पुणे पोलिसांना पाहिजे आणि फरार असे तब्बल २ हजार ६०० गुन्हेगार हवे आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. तर मोक्का व एमपीडीएनुसार कारवाई केल्यानंतर पसार असणाऱ्यांना देखील शोधले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाहिजे आरोपींचा हा आकडा तितकाच आहे. तो कमी होत नसल्याचे वास्तव आहे. त्यात भरच पडत आहे. शोध घेऊनही आरोपी सापडत नाहीत. तर, अनेक महिने त्यांचा पाठलाग व पाठपुरावा करावा लागतो. अशावेळी न मिळणाऱ्या आरोपींवरील लक्ष काढून टाकले जाते. गांर्भियाने त्याकडे पोलीसही लक्ष देत नाहीत.
प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिस योजना सुरू करण्यात आली असून, आरोपींना पकडणाऱ्या पोलिसांना बक्षिस दिले जाणार आहे. परंतु, या बक्षिस योजनेवरून आता पुणे पोलीस टीकेचे धनी अन् चेष्टेचा विषय ठरत आहेत. कारण, आरोपींना पकडण्यासाठी देखील पोलिसांना बक्षिस का.? मग त्यांच कामच काय, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आरोपींना पकडण्या बाबतच्या बक्षिस योजनेची चर्चा सुरू असतानाच मोक्कातील एक आरोपी पोलिसांच्या तावडीतून पसार झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मार्केटयार्ड पोलिसांच्या तपास पथकाला धक्काबुक्की करून तो पळाला असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांना आहे त्या आरोपींना सांभाळता येईना अन् फरार आरोपींना पकडण्यासाठी बक्षिस योजना कशाला असेही म्हटले जाऊ लागले आहे.
कारवाई व बक्षिस…
पिस्टल पकडणे- १० हजार
कोयता, तलवारी व शस्त्र- ३ हजार
फरारी आरोपी पकडणे- १० हजार
पाहिजे आरोपी पकडणे- ५ हजार
मोक्कातील आरोपीला पकडणे- ५
एमपीडीएतील आरोपी पकडणे- ५
तडीपार पकडणाऱ्यांस – २ हजार
एखादा गुंड अजिबातच सापडत नसेल तर त्याला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले जाते. वीरप्पन, चार्ल्स शोभराज सापडत नव्हते तेव्हा अशा प्रकारचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मात्र सरसकट बक्षीस जाहीर केले जात असेल तर पोलीस यंत्रणेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात. पोलिसांनी नवीन पायंडे पाडू नये, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
बक्षिस कोणासाठी दिले जाते…
देशात गुन्हेगारांना पकडण्यासाठी बक्षिस देण्याच्या अनेक घटना यापुर्वी घडलेल्या आहेत. पण, त्या कुविख्यात व गाजलेल्या तसेच गंभीर गुन्ह्यात अनेक वर्षांपासून गायब असणाऱ्या आरोपींना पकडणाऱ्यांना बक्षिस घोषीत केले जाते. वीरप्पन, चार्ल्स शोभराज हे सापडत नसल्याने बक्षिस घोषीत केले होते. पण, पुण्यातील गुन्हेगारांना सरसकट पकडण्यासाठी बक्षिस योजना आणल्याने पुण्यातील सर्वच गुन्हेगारी वीरप्पन आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.