मागासवर्ग, दिव्यांगासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवावा : रामदास आठवले

केंद्र आणि राज्य शासनाकडून मागासवर्ग, दिव्यांग लोकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ समाजातील तळागाळातील लोकापर्यंत पोहचवावा, योजनांचा अटी शर्तीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या शासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, केंद्रीय सामाजिक न्याय विभागाकडील योजनांचा लाभ घेण्यासाठी सांगली जिल्ह्यातून जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करावेत

    सांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : केंद्र आणि राज्य शासनाकडून मागासवर्ग, दिव्यांग लोकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ समाजातील तळागाळातील लोकापर्यंत पोहचवावा, योजनांचा अटी शर्तीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या शासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, केंद्रीय सामाजिक न्याय विभागाकडील योजनांचा लाभ घेण्यासाठी सांगली जिल्ह्यातून जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

    शासकीय विश्रामगृह, सांगली येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्र आणि राज्य शासनाकडून मागासवर्गिय, दिव्यांग तसेच इतर सर्व घटकांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.स्वाती देशमुख, पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डेवार, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर, जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी बाळासाहेब कामत आदी उपस्थित होते.

    केंद्र शासनाकडून देशात जनधन योजनेअंतर्गत 45 कोटी 15 लाख, महाराष्ट्रात 3 कोटी 14 लाख तर सांगली जिल्ह्यात 25 लाख 33 हजार इतकी खाते उघडण्यात आली आहेत. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत देशात 9 कोटी 10 हजार, महाराष्ट्रात 44 लाख 96 हजार तर सांगली जिल्ह्यात 1 लाख 18 हजार लोकांना लाभ देण्यात आला आहे.

    तसेच ते पुढे म्हणाले, शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना समाजातील तळागातील लोकापर्यंत पोहचविण्यासाठी योजनांच्या निकषांमध्ये काही त्रुटी असल्यास त्याबाबतची माहिती ज्या त्या विभागास कळविण्यात यावी. जेणे करुन खऱ्या लाभार्थ्यास त्या योजनांचा लाभ देणे शक्य होईल. केंद्रीय सामाजिक न्याय विभागामार्फत दिव्यागांना विविध साहित्यांचे वाटप करण्यात येते. आतापर्यंत जवळपास 30 लाख दिव्यागांना त्याचा लाभ देण्यात आला आहे.

    सांगली जिल्ह्यातील दिव्यांगाचा सर्व्हे करुन त्याबाबतची माहिती तात्काळ संबधित खात्याकडे कळविण्यात यावी व त्यानूसार लवकरच सांगलीमध्ये दिव्यांगाना साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा, अशी सूचना त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिली.

    यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, पुरवठा विभाग, दिव्यांगासाठींच्या योजना, ॲट्रोसिटी कायदा, नशा मुक्ती केंद्र, वृध्दाश्रम, शासकीय निवासी शाळा, अंकलखोप येथील डॉ. बाबसाहेब आंबेडकर स्मारकाबाबतचा आढावा संबधित अधिकाऱ्यांकडून घेतला.