शिंदे गट आणि भाजपात सारं काही आलबेल नाही, विधान परिषदेच्या नावांवरुन वाद; आता संजय गायकवाड म्हणाले…

राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्हाला आपल्याच घरात साप पाळल्यासारखे वाटत होते. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो, याचे गिरीश महाजन यांनी क्रेडिट घेण्याची गरज नाही, असा खोचक टोला देखील आमदार संजय गायकवाड यांनी गिरीश महाजन यांना लगावला आहे.

  बुलढाणा : शिवसेना (Shivsena) फोडण्याचं आमचं मिशन होतं, आणि आम्ही ते पूर्ण केले असं गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सांगितले. गिरीश महाजन यांचे विधान बुलढण्याचे शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी खोडून काढले आहे. गिरीश महाजन यांनी केलेलं हे विधान चुकीचं आहे. आम्ही भाजपमुळे शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही, तर उद्धव ठाकरे घराच्या बाहेर येत नव्हते, आमची कुठलीच कामे होत नव्हती, आम्हाला वर्षावर, मातोश्रीवर एन्ट्री नव्हती, त्यामुळे आम्ही बाहेर पडलो आहे.

  …तर कारखान्यातील गैरव्यवहारामुळं कारवाई

  दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्हाला आपल्याच घरात साप पाळल्यासारखे वाटत होते. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो, याचे गिरीश महाजन यांनी क्रेडिट घेण्याची गरज नाही, असा खोचक टोला देखील आमदार संजय गायकवाड यांनी गिरीश महाजन यांना लगावला आहे. तर हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीची झालेली कारवाही पक्ष किंवा नेता म्हणून नव्हे तर त्यांच्या कारखान्यातील गैरव्यवहारामुळे झाली असल्याचेही आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.

  महाजनांचे मी स्वागत करतो- राऊत

  भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उजव्या हात गिरीश महाजन यांनी जळगावात मुख्यमंत्र्यांच्या समोर एक विधान केले आहे. शिवसेना फोडणं हे आमचे मिशन होतं आणि त्यांनी पूर्ण केलं आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. हे विधान मुख्यमंत्र्यांसमोर केलं, असताना मोठी गोष्ट आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामुळे आम्ही शिवसेना सोडली. या गोष्टीवरती काल गिरीश महाजन यांनी पडदा टाकला व भाजपासाठी कारणीभूत आहे असे सांगितले. त्यांचे मी स्वागत करतो, असं संजय राऊतांनी म्हटले आहे.

  देवेन भारती यांच्या नियुक्तीवरून मतभेद

  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे समजते. विशेष म्हणजे मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या नियुक्तीवरून या दोन्ही पक्षात वाजल्याचे समजते. विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गोटात खडाजंगीबरोबरच मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांच्या नियुक्तीवरही वाद झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या गटातील एका ज्येष्ठ मंत्र्याने हा मुद्दा उपस्थित केला होता. अशी चर्चा मंत्रालयात सुरू आहे. देवेन भारती यांची विशेष पोलिस आयुक्तपदी नियुक्ती केल्याने मुंबई पोलिसांत नाराजीचे वातावरण आहे.

  दोन्हीकडून धुसफूस…

  दरम्यान, भाजपा व शिंदे गटात दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद असून, धुसफूस सुरु असल्याचं बोललं जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत शिंदे गटातील मंत्र्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांमध्ये जोरदार वादावादी सुरू होताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित असलेल्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले, अशी माहिती समोर येत आहे.

  विधानपरिषदेच्या जागांवरुन खडाजंगी…

  नाशिक विधानपरिषदेच्या जागेबाबत मुख्यमंत्री शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी भाजपवर उघडपणे टीका केली. या जागेचा उमेदवार त्यांच्या आणि शिंदे गटाच्या सहमतीनेच ठरवावा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. विधान परिषदेच्या पाच जागांसाठी (तीन शिक्षक आणि दोन पदवीधर जागा) निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यातील तीन जागांवर भाजप तर दोन जागांवर शिंदे गट उमेदवार उभे करणार. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये हा समझोता झाला होता. या परस्पर करारानुसार कोकण आणि नाशिकची जागा शिंदे गटाला मिळाली. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोकण शिक्षक मतदारसंघातून ज्ञानेश्वर म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर केल्याने शिंदे गटात नाराजीचं वातावरण आहे.