
पुणे महापालिका निवडणुकीमध्ये रंगत, इच्छुकांच्या राजकीय हालचालींना वेग; महिला सदस्यही लढणार
पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांचे वातावरण दिवसेंदिवस रंगत आहे. प्रभागांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुकांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. ज्या प्रभागांमध्ये महिला आरक्षण लागू झाले आहे, त्या ठिकाणी पुरुष नगरसेवकांनी आपल्या घरातील महिला सदस्यांना पुढे करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे. शहरभर विविध ठिकाणी पत्नी, आई किंवा मुलींचे फ्लेक्स, बॅनर आणि सोशल मिडीयावरील पोस्ट झळकू लागल्या आहेत. त्यामुळे राजकारणापासून दूर असलेल्या ‘घरातील कारभारीण’ आता थेट राजकीय मैदानात उतरल्याचे चित्र दिसत आहे.
आरक्षण सोयीचे पडल्याने उमेदवारीसाठी इच्छुकांनी आपल्या पक्षातील संपर्क वाढवण्यास सुरूवात केली आहे. काहींनी थेट पक्ष कार्यालयांना भेटी देऊन शहराध्यक्षांसोबत चर्चा केली आहे. विद्यमान नगरसेवकांकडूनही पुढील निवडणुकीत आपले गणित कसे बसवता येईल यावर विचारमंथन सुरू आहे. अनेकांनी इतर पक्षांतून तिकिट मिळविण्याची शक्यता तपासण्यास सुरुवात केली असून, त्यामुळे शहरातील प्रमुख पक्षांच्या कार्यालयांत गर्दी वाढली आहे.
महापालिकेच्या १६५ जागांपैकी तब्बल ८३ जागा महिलांसाठी राखीव असल्याने विद्यमान नगरसेवकांची चांगलीच कोंडी झाली आहे. पुरुष नगरसेवकांना आपल्या जागा टिकवण्यासाठी घरातील महिलांना पुढे करावे लागत आहे. काही ठिकाणी नगरसेवकांच्या पत्नींचे तर काही ठिकाणी मातोश्री किंवा कन्यांचे पोस्टर शहरभर झळकताना दिसत आहेत. सोशल मिडीयावरही या नव्या चेहऱ्यांचा प्रचार जोरात सुरू झाला आहे.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुकांनी संबंधित प्रभागांतील समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. बुधवारी दिवसभर महापालिकेतील अधिकाऱ्यांना निवेदन देणे, फोटोसेशन करणे, नागरिकांशी संवाद साधणे, यावर काहींचा भर होता. आगामी निवडणुकीत आपली ओळख मजबूत व्हावी, यासाठी सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.
निवडणुकीत अपक्ष म्हणून यश मिळवणे कठीण असल्याने बहुतेकांनी राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षांकडून तिकीट मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपकडून लढण्याची इच्छा असलेले अनेक जण संधी मिळाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवार गटाशी संपर्क साधताना दिसत आहेत. त्यामुळे पुण्यातील राजकीय गणितात मोठ्या फेरबदलांच्या चर्चा सुरू आहेत.
आरक्षणामुळे काहींची स्वप्ने मोडली असली तरी अनेक नवीन चेहरे आता या मैदानात उतरणार आहेत. काहींसाठी हे राजकारणातील पहिले पाऊल असेल, तर काहींसाठी विद्यमान नगरसेवकांचे ‘बॅकअप प्लॅन’. घरातील महिला सदस्यांना पुढे करून अनेकजण आपली राजकीय परंपरा टिकविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूक ही फक्त पक्षांमधील नव्हे, तर कुटुंबांतील राजकीय समीकरणांचीही परीक्षा ठरणार आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेची निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे. आरक्षणाचे गणित, तिकिटासाठीची धडपड, महिला उमेदवारांचा वाढता प्रभाव आणि घराघरात सुरू असलेली राजकीय चर्चा या सगळ्यामुळे शहरातील राजकारण चांगले तापणार आहे.
देवदर्शन यात्रांचा वाढला जोर
इच्छुक उमेदवारांकडून प्रभागामध्ये महिलांसह पुरुषांसाठी देवदर्शन यात्रा काढण्यावर भर दिला आहे. यात्रांमध्ये थेट मतदारांशी संवाद साधणे सोपे होत आहे. एक ते दोन दिवसांचा प्रवास आणि त्यात प्रत्येकाची घेतली जाणारी काळजी यामुळे मतदार आणि उमेदवारांमध्ये थेट संवाद होत आहे. त्यामुळे प्रभागांमध्ये कार्यक्रम घेण्याऐवजी थेट देवदर्शन यात्रा घेवून जाण्यावर भर दिला जात आहे