अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात मंत्री महोदयांनी केलेल्या सर्व घोषणा पूर्णत्वाच्या मार्गावर

आमदार रोहित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवासाठी शासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. दरम्यान आाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवासाठी राज्य शासनातर्फे 25 लाख रुपये निधी दरवर्षी उपलब्ध होणार आहे. 

    जामखेड : 31 मे रोजी जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवासाठी शासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

    त्यासंदर्भात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जयंतीसाठी 25 लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे त्याच ठिकाणी घोषित केले होते. त्यानंतर आता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिल्या आहेत. त्यानुसार आता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवासाठी राज्य शासनातर्फे 25 लाख रुपये निधी दरवर्षी उपलब्ध होणार आहे.

    यासोबतच आमदार रोहित पवार यांनी पालकमंत्र्यांकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी संग्रहालय उभारण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा या संदर्भात मागणी केली आहे. त्या मागणीवरही सकारात्मक प्रतिसाद देत हसन मुश्रीफ साहेब यांनी सदरील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

    अहिल्यादेवींच्या कार्यकाळात निर्माण झालेल्या अनेक विहिरी व बारव कर्जत-जामखेड तालुक्यात आहेत. त्यांची सध्या अत्यंत दुरवस्था झाल्याचे पाहायला मिळते. या सर्व विहिरी आणि बारवांचे सर्वेक्षण करून त्यांच्या जीर्णोद्धारासाठी व चौंडी येथे दोन स्वागत कमानीच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली आहे. त्यांच्या या मागणीवर अदिती तटकरे यांनीही तात्काळ पावले उचलून अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार आता लवकरच शासनाकडून या कामासाठी निधी उपलब्ध होऊन काम पूर्णत्वास जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.