झेडपीच्या पाणीपुरवठा टेंडरमध्येही टक्केवारीचा आरोप; जनशक्ती संघटनेने दिला अधिकाऱ्यांना ‘हा’ इशारा

पाणीपुरवठा विभागातर्फे काढण्यात आलेल्या नळपुरवठा पाणीपुरवठ्याची कामे देताना टक्केवारी घेण्यात येत असल्याचा आरोप जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे- पाटील यांनी केला आहे.

    सोलापूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे दलितवस्ती विकास योजनेच्या कामासाठी टक्केवारी घेण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर आता पाणीपुरवठा विभागातर्फे काढण्यात आलेल्या नळपुरवठा पाणीपुरवठ्याची कामे देतानाही टक्केवारी घेण्यात येत असल्याचा आरोप जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे- पाटील यांनी केला आहे.

    झेडपीच्या पाणीपुरवठा विभागातर्फे जानेवारी ते जून या काळात केंद्र शासनाच्या जलजीवन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेच्या कामांची १८९ कोटीचे ऑनलाइन टेंडर प्रसिद्ध करण्यात आले होते. टेंडर ओपन करून मंजूर झालेल्या कामांची यादी तेरा सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करायची होती. पण यादी प्रसिद्ध न झाल्याने कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांची भेट घेऊन यादीबाबत कल्पना दिली. पण त्यांनी यादीबाबत प्रतिसाद दिला नाही. यातील बरीच कामे अधिकाऱ्यांनी संगणमत करून मर्जीतील ठेकेदारांना दिल्याचे सांगण्यात येत आहे.

    जल जीवन मिशनअंतर्गत करण्यात येणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामातून गावातील सामान्य लोकांची तहान भागणार आहे. पण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना या योजनेविषयी काही देणे घेणे नसल्याचे दिसत आहे. टेंडर मॅनेज करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पात्र ठेकेदारांची यादी प्रसिद्ध करणे लांबविले आहे. अक्कलकोट, करमाळा, बार्शी, माढा, माळशिरस, दक्षिण सोलापूर या तालुक्यातील पात्र ठेकेदारांची यादी अद्याप प्रसिद्ध केलेली नाही. ही यादी २० सप्टेंबरपर्यंत प्रसिद्ध न केल्यास २१ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा आणला जाईल, असा इशारा खूपसे- पाटील यांनी जिल्हा परिषदेचे सीईओ व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

    टक्केवारी खटाटोप…

    जलजीवन मिशनच्या नळ पाणीपुरवठा योजनेत फायनल झालेले टेंडर अधिकाऱ्यांनी वेळेत प्रसिद्ध करणे अनिवार्य आहे. असे असतानाही कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांनी पात्र ठेकेदारांची यादी जाहीर केली नाही. टेंडर मॅनेज करणे व टक्केवारीसाठी जाणीवपूर्वक हा विलंब करण्यात येत असल्याचा आरोप खूपसे- पाटील यांनी केला आहे.