छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली तरी जागेचा सस्पेन्स कायम; हेमंत गोडसेंचे उमेदवारीकडे डोळे

देशभरासह महाराष्ट्रातही लोकसभेच्या (Lok Sabha Election) पाच जागांवर शुक्रवारी मतदान झाले. मात्र, असे असले तरी राज्यात महायुतीमधील (Mahayuti) अनेक जागांवर अद्याप वाद कायम आहे.

    नाशिक : देशभरासह महाराष्ट्रातही लोकसभेच्या (Lok Sabha Election) पाच जागांवर शुक्रवारी मतदान झाले. मात्र, असे असले तरी राज्यात महायुतीमधील (Mahayuti) अनेक जागांवर अद्याप वाद कायम आहे. काही जागांचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यात नाशिक (Nashik Lok Sabha), छत्रपती संभाजीनगर, मुंबई येथील लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. या जागेवर तिढा निर्माण झाल्यामुळे माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, नाशिकची जागा आता कोणाला मिळणार हा प्रश्न अजूनही सुटलेला नसून त्याचा सस्पेन्स कायम आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधून छगन भुजबळ यांनी निवडणूक लढवावी, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदेश असल्याचे सांगितले होते. परंतु, त्यानंतर छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला.

    त्यामुळे आता एकीकडे ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळेल, असे जवळपास निश्चित झाले आहे. पण, शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना की अजय बोरस्ते हा सस्पेन्स अद्याप कायम आहे. मात्र, दुसरीकडे भाजपने या जागेवर आपला दावा कायम ठेवल्याने गोडसे यांच्यापुढे उमेदवारीचा पेच कायम आहे.