तब्बल २६ वर्षांनी एकत्र आले माजी विद्यार्थी!

हायस्कुलमधील 1996-97 च्या दहावीतील माजी विद्यार्थी 26 वर्षांनी पुन्हा एकत्र येऊन शाळेमध्ये स्नेहमेळाव्याचे आयोजन.

    देवगड : “अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवुनी जाती.” या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ही पाखरे परत एकदा शाळेच्या प्रांगणात उतरली. औचित्य होते अनंत कृष्ण केळकर हायस्कूल वाडा येथे झालेल्या १९९६-९७ मधील दहावीतील माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते.

    शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई – वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत. याच ऋणानुबंधातून वाडा येथील अनंत कृष्ण केळकर हायस्कुलमधील 1996-97 च्या दहावीतील माजी विद्यार्थी 26 वर्षांनी पुन्हा एकत्र येऊन शाळेमध्ये स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते.

    अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जवळजवळ २६ वर्षांनंतर एकमेकांना भेटले. त्यामुळे अनेक जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. अनेकांना आपले शाळेचे जुने मित्र-मैत्रिणी भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. प्रथम सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन आणि मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यामध्ये नसलेल्या कै. महेश जोशी, कै. जितेंद्र इंदुलकर, कै.निलेश पांचाळ, कै.शोभा गुरव या मित्रमैत्रिणीना भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली.

    या स्नेह मेळाव्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष सदानंद पवार, सचिव शंकर धुरी, दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक निरंजन दीक्षित, संस्था समन्वयक कुमार फडके, स्थानिक समितीचे अध्यक्ष सहदेव पुजारे, मुख्याध्यापक नारायण माने, शिक्षक दिनकर जोशी, उल्का जोशी, अनुराधा दीक्षित, मनोहर भगत, संभाजी जाधव, श्री. पवार आदी उपस्थित होते. प्रत्येक विद्यार्थ्याने आपली ओळख करून देताना आपण सध्या काय करतो हे देखील सांगितले. काही विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील आठवणी सांगितल्या. अनेक विद्यार्थी नवनव्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. यामध्ये पोलीस, पत्रकार काहीजण मुंबईमध्ये तर काही विद्यार्थी बाहेर गावी कामासाठी आहेत. अनेकजण आंबा बागायतदार, दुकानदार अशी ओळख करून दिली.

    शिक्षकांनी देखील २६ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांची प्रगती झालेली पाहून समाधान व्यक्त केले. संस्था पदाधिकाऱ्यांनी देखील मौलिक मार्गदर्शन करून शाळेचे ऋण लक्षात ठेवून शाळेला सहकार्याची भावना व्यक्त केली. सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी वॉटर क्युरीफायर भेट दिला. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना साधे, थंड आणि गरम पाणी देखील पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे. माजी विद्यार्थ्यांमध्ये हर्षद जोशी, प्रशांत वाडेकर, विवेक वेलणकर, विवेक तावडे, शैलेश परब, नितीन पुरळकर, अयोध्याप्रसाद गांवकर, वैभव परब, निशांत कोयंडे, प्रवीण उपरकर, सतीश वाडेकर, प्रवीण बिर्जे, बाबाजी पुजारे, संतोष पुजारे, एकनाथ पुजारे, संतोष बिर्जे, सुजय पुजारी, निलेश वाडेकर, दीपक शिर्सेकर, सुमन गुरव, पुनम गुरव, वर्षा पांचाळ, भारती वाडेकर, संजीवनी जाधव, दीपाली मेस्त्री, गीता मेस्त्री, कविता नर, वृंदा भाबल, परेश हिरनाईक, देवयानी भाबल, मंगेश तेली यांनी एकत्र येत दहावीच्या वर्गात बसून जून्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक वेलणकर याने तर प्रास्ताविक हर्षद जोशी याने केले.