जिल्हा पोलीस प्रमुखांची दानवेंनी केली खरडपट्टी; राजेश क्षीरसागर यांच्या मारहाण प्रकरणावरून आक्रमक

कोल्हापुरातील वरपे कुटुंबीयांना घरात येऊन मारहाण करण्याचे राजेश क्षीरसागर यांचे प्रकरण गाजले होते. क्षीरसागर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष असून, शिवसेनेचे (शिंदे) नेते आहेत. यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे कोल्हापुरात आक्रमक झाले होते.

  कोल्हापूर : कोल्हापुरातील वरपे कुटुंबीयांना घरात येऊन मारहाण करण्याचे राजेश क्षीरसागर यांचे प्रकरण गाजले होते. क्षीरसागर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष असून, शिवसेनेचे (शिंदे) नेते आहेत. यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे कोल्हापुरात आक्रमक झाले होते.

  राजेश क्षीरसागर यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वरपे कुटुंबीयांना घरात घुसून मारहाण केली होती. कोल्हापूर शासकीय विश्रामगृहात दानवेंनी जनता दरबार घेतला. यात वरपे कुटुंबीय न्याय मागण्यासाठी आले होते. यावेळी अंबादास दानवे यांनी पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांची फोनवरून चांगलीच खरडपट्टी केली.

  पोलिसांकडून राजेश क्षीरसागर यांच्यावर गुन्हा नोंद होण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने दानवेंनी स्वतः जिल्हा पोलिस प्रमुखांना संपर्क करत चांगलाच दम दिला. क्षीरसागर यांच्यावर गुन्हा नोंद करून तत्काळ कारवाई करण्याचे सांगत त्यांना चांगलेच सुनावले.

  शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी घरगुती वादावरून अपार्टमेंटमधील शेजाऱ्यांच्या घरात घुसून वरपे कुटुंबास का मारहाण केली होती. याला तीन महिने उलटूनही क्षीरसागर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. त्यावर वरपे कुटुंबाने अंबादास दानवेंची शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन व्यथा मांडली.

  वरपे कुटुंबीयांचे ऐकल्यानंतर दानवेंनी थेट जिल्हा पोलिसप्रमुख महेंद्र पंडित यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि राजेश क्षीरसागर तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करत नसल्याचा जाब विचारला.

  पोलिसप्रमुखांची खरडपट्टी करताना नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर कोण आहे ? वरपे कुटुंबीयांना मारहाण केली, त्याच्यावर गुन्हा नोंद का झाला नाही? क्षीरसागर यांच्या बापाची जहागीर आहे का? तुम्ही आरोपीला संरक्षण देता का? या शब्दांत दानवेंनी पोलिसप्रमुखांची खरडपट्टी काढत तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

  अधिवेशनात तुम्हाला बघून घेऊ

  पोलिसांची आणि क्षीरसागर यांची मस्ती चालणार नाही. तत्काळ गुन्हा दाखल झाला नाही, तर येणाऱ्या अधिवेशनात तुम्हाला बघून घेऊ, अशी धमकीच अंबादास दानवेंनी जिल्हा पोलिसप्रमुख महेंद्र पंडित यांना दिली आहे.

  डीवायएसपी विश्रामगृहात दाखल

  पोलिसप्रमुख महेंद्र पंडित यांना दानवेंनी जाब विचारल्यानंतर पुढच्या १० मिनिटांत डीवायएसपी अजित टिके शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. त्यांनी वरपे कुटुंबीयांच्या तक्रारीची दखल घेऊन क्षीरसागर यांच्यावर गुन्हा नोंद करण्याच्या सूचना दिल्या.