
सध्या गव्हर्नमेंट इंजिनियरिंग कॉलेजमध्ये पुरेसे शिक्षक नसल्याने अनेक विभाग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत...
अंबादास दानवे : आज अंबादास दानवे हे छत्रपती संभाजीनगर मध्ये होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, मराठवाड्यासाठी मागील फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत केलेल्या घोषणा अजुनही पूर्ण झालेल्या नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संभाजीनगरमधील घोषित स्मारकाचे काम किती वर्ष चालणार? असा प्रश्न अंबादास दानवे यांनी सरकारला केला आहे. धाराशिवच्या तेर येथे वस्तुसंग्राहलयसाठी घोषित आठ कोटींचे काम अजूनही सुरूच आहे. सुमारे ४५० कोटींच्या म्हैसमाळ विकास आराखड्याचे काय झाले? नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या विकासासाठी घोषित सुमारे २५० कोटी कुठे आहेत? असे प्रश्न अंबादास दानवे यांनी सरकारला केले आहेत.
पुढे ते म्हणाले, लातूरला विभागीय क्रीडा संकुल दिले होते. ते आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बांधणार आहात का? मराठवाड्यात डेअरी विकास बोर्डाच्या माध्यमातून १००० गावात दूध योजना ‘आणून १.२५ लाख लोकांना रोजगार देणार होतात. योजना नक्की मराठवाड्यासाठीच होती की विदर्भासाठी?संभाजीनगरमधील करोडीला ट्रान्सपोर्ट हब बनवणार होतात. अजून जमीन सापडली नाही का? परभणी येथे ६८ एकरावर टेक्स्टाईल पार्क उभारणार होतात, तुम्ही साधी जागा तरी पाहिली आहे का या प्रकल्पासाठी? मराठवाड्याची वॉटर ग्रीड योजना कुठे आहे ? आज मराठवाडा पुन्हा दुष्काळाच्या काळ्या छायेत गेला आहे. कृष्ण-मराठवाडा सिंचन योजनेसाठी ४८०० कोटी देणार होतात. किती कवड्या दिल्या, काम किती झाले? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार अंबादास दानवे यांनी सरकारवर केला आहे.
पुढे अंबादास दानवे म्हणाले, नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी २८२६ कोटींची कबुली होती. किती निधी दिलात, कारण प्रकल्प अजूनही अपूर्णच आहे. विमानतळ विस्तारीकरणासाठी २०० कोटीची घोषणा केली आहे. विस्तार राहील विमानांची नवीन शहरांशी जोडणी संभाजीनगरला मिळावी यासाठी साधे पत्र तरी लिहिले का? संभाजीनगर पॉलिटेक्निकला अभियांत्रिकी महाविद्यालयात रूपांतर करण्यासाठी एक कोटी देणार होता. सध्या गव्हर्नमेंट इंजिनियरिंग कॉलेजमध्ये पुरेसे शिक्षक नसल्याने अनेक विभाग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, अजून एक कॉलेज देऊन तिथे काय पाहायचे ? नुसत्या भिंती? लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाच्या संस्थेला २७९ कोटी देणार होतात. प्रत्यक्षात मंजूर केले फक्त १२ कोटी. २५ हजार हेक्टरवर फळबागा उभारण्यासाठी ३७५ कोटींची कबुली होती. आज ती झाडे मोठी झाली असती न सांगता, ही बाग नेमकी कुठे आहे? जालन्यात सीड पार्क साठी १०९ कोटींचा वायदा होता अजूनही मिळालेले नाहीत.