अंधाराने केला घात, अल्पवयीन प्रेमीयुगुल बाईकसह विहिरीत पडले; युवक बचावला मात्र प्रेयसीचा बुडून मृत्यू

सांगलीच्या ( Sangli) तासगाव (Tasgaon) तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावांतील अल्पवयीन प्रेमीयुगुल मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीसह विहिरीत पडल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे. या घटनेत युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर युवक बचावला.

    सांगली : सांगलीच्या ( Sangli) तासगाव (Tasgaon) तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावांतील अल्पवयीन प्रेमीयुगुल मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीसह विहिरीत पडल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे. या घटनेत युवतीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर युवक बचावला. याबाबत तासगाव पोलिसांत नोंद झाली आहे.

    दुचाकीसह विहिरीत जाऊन कोसळले

    तासगाव तालुक्यातले दोन वेगवेगळ्या गावात राहणारे एक प्रेमीयुगुल फिरण्यासाठी तासगाव तालुक्यातल्या पेड नजीक पर्यटन केंद्राच्या ठिकाणी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास घरी परतत असताना या प्रेमयुगुलांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये अल्पवयीन तरूणीचा बुडून मृत्यू झाला, तर अल्पवयीन तरूण बचावला आहे. हे प्रेम युगुल दुचाकीवरून पेडपासून काही अंतरावर आले असता त्यांना रस्त्याचा अंदाज आला नाही आणि रात्र असल्याने काही कळण्याच्या आतच ते दोघंही दुचाकीसह थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरीत जाऊन कोसळले.

    प्रेयसीला वाचवू शकला नाही

    विहिरीमध्ये कोसळल्यानंतर मुलाला पोहता येत असल्याने तो कसाबसा विहिरीतून बाहेर आला. मात्र, तो त्याच्या प्रेयसीला वाचवू शकला नाही. तर तिला पोहता येत नसल्याने तिचा विहिरीतच मृत्यू झाला. विहिरीच्या बाहेर आल्यानंतर तो तरूण निघून गेला. सदर घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर मुलीच्याही शोधाच्या निमित्ताने नातेवाईक या ठिकाणी पोहोचले.

    त्यानंतर पोलीस आणि रेस्क्यू टीमच्या माध्यमातून विहिरीमध्ये शोध घेऊन मुलीचा मृतदेह आणि त्या ठिकाणी पडलेली दुचाकी बाहेर काढण्यात आली. या प्रकरणी युवतीच्या पालकांनी तासगाव पोलीस स्टेशनमध्ये संबंधित तरूणाच्या विरोधात तक्रार दाखल केली असून अधिक तपास तासगाव पोलीस करत आहेत.