Amit Shah said, I will give an account of Modi government's work in the last 10 years, Sharad Pawar should give an account of his work in five years

  Amit Shah on Sharad Pawar : मागील 50 वर्षांपासूनचा हिशोब जाऊ द्या शरद पवारांनी फक्त पाच वर्षांचा कामांचा हिशेब द्यावा. मग मी मोदी सरकारच्या मागील १० वर्षांच्या कामांचा हिशेब देईन, अमित शाह यांचा जोरदार हल्लाबोल

  निवडणुकीच्या प्रचारालादेखील सुरुवात

  भारतीय जनता पार्टी सध्या देशभर लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करत आहे. तसेच भाजपा नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारालादेखील सुरुवात केली आहे. यांतर्गत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज (५ मार्च) जळगाव येथे सभा पार पडली. या सभेत बोलताना अमित शाह यांनी मतदारांना पुन्हा एकदा भाजपाला मत देऊन नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यास सहकार्य करा, असं आवाहन केलं. तसेच शाह यांनी यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली. तसेच महाविकास आघाडीला तीन चाकांची रिक्षा संबोंधलं. ही रिक्षा पंक्चर झालेली असून महाराष्ट्राचा विकास करणार नाही, असं वक्तव्य शाह यांनी यावेळी केलं.

  नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनून केवळ १० वर्षे झाली

  अमित शाह म्हणाले, मी शरद पवारांना सांगेन की, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनून केवळ १० वर्षे झाली आहेत. या १० वर्षांमध्ये आम्ही देशाचा खूप विकास केला. परंतु, अवघा महाराष्ट्र गेल्या ५० वर्षापासून शरद पवारांचं ओझं वाहतोय. महाराष्ट्र त्यांना सहन करतोय. त्या ५० वर्षांचा राहू देत, परंतु तुम्ही तुमच्या पाच वर्षांचा हिशेब द्या. मी मोदी सरकारच्या काळातील दहा वर्षांचा हिशेब द्यायला इथे आलो आहे.

  अमित शाह जनतेला संबोधित करताना म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाला संधी द्या. पंतप्रधान मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था ११ व्या नंबरवरून पाचव्या नंबरवर आणली आहे, ती आपल्याला तिसऱ्या नंबरवर न्यायची आहे. काँग्रेसला जे ७० वर्षांमध्ये जमलं नाही ते आम्ही १० वर्षांमध्ये करून दाखवलं आहे. त्यांनी व्होट बँकेसाठी ७० वर्षे रामलल्लांना तंबूत ठेवलं. परंतु, आमच्या सरकारने रामलल्लांचं मंदिर बांधून दाखवलं.