अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात येऊ नये, अन्यथा… भास्कर जाधव यांचा इशारा

    रत्नागिरी: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षश्रेष्ठींचे महाराष्ट्र दौरे वाढले आहेत. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणार आहेत. त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रत्नागिरीमध्ये प्रचारसभा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर याबाबत तुफान चर्चा सुरु आहे. रत्नागिरीमध्ये महायुतीकडून नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात येऊ नये, अन्यथा येथील जनता त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी दिला आहे.

    नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?

    भास्कर जाधव म्हणाले, “खाशाबा जाधव एवढेसे होते. त्यांच्यासमोर भलेमोठे परदेशी पैलवान होते. मात्र, त्यांनी या पैलवांनाना पराभूत करून सुवर्णपदक मिळवलं. आमचे विनायक राऊतही तसेच आहेत. मी आज अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांना सांगतो की तुम्ही कोकणात येण्याच्या भानगडीत पडू नका. इथे आलात तर कोकणातील जनता तुम्हाला कोकणच्या मातीचं पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही,” इशारा भास्कर जाधव यांनी दिला.

    रत्नागिरीची लढाई देखील जोरदार रंगणार आहे. कारण भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच यांच्याविरोधात ठाकरे गटाने राणेंचे कट्टर विरोधक असलेल्या विनायक राऊत यांना उमेदवारी दिली आहे. या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी करण्यात येत आहे. त्यामुळे कोकणातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. महत्त्वाचे म्हणजे, विनायक राऊत यांनी या मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक जिंकली आहे. आता सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून ते विजयाची हॅटट्रिक करण्याच्या प्रयत्नात आहेत.