अमित शाह यांचा नाशिक दौरा रद्द, नेमकं कारण काय? : जाणून घ्या सविस्तर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने 21 जूनला नाशिक दौऱ्यावर येणार होते. पण त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. अमित शाह यांच्या ऐवजी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.

    नाशिक : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने 21 जूनला नाशिक दौऱ्यावर येणार होते. पण त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. अमित शाह यांच्या ऐवजी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.

    महत्वाचं म्हणजे, अमित शाह यांचा दोन दिवसीय कार्यक्रमांचं नियोजन पूर्ण झालेलं होतं. पण तसं असताना अचानक त्यांचा दौरा रद्द झाला आहे. अग्निपथ योजनेवरुन देशात वातावरण तापल्याने त्यांचा दौरा रद्द झाला आहे. त्यामुळे दौरा रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार केंद्र सरकार तरुणांना चार वर्ष भारतीय सैन्यात काम करण्याची संधी देणार आहे. पण केंद्र सरकारच्या योजनेला देशभरात प्रचंड विरोध होत आहे. अनेक ठिकाणी या योजनेला विरोध करताना विद्यार्थ्यांनी कायदा हातात घेतल्याचं बघायला मिळालं आहे. काही ठिकाणी तर रेल्वे जाळण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात या योजनेवरुन रोष दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. पण केंद्र सरकारने तरीही ही योजना मागे घेणार नसल्याचं म्हटलं आहे.