अमित ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर; मनसेचे महासंपर्क अभियान

राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे आजपासून नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. महासंपर्क अभियानाचा भाग म्हणून ६ ते ९ ऑगस्ट असे चार दिवस भेट देणार आहेत.

    मुंबई : शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thakaray), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), शरद पवार (Sharad Pawar) यांच्यानंतर आता राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thakaray) हे देखील आजपासून नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) जाणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपले पूत्र अमित यांना राज्यव्यापी दौऱ्यावर पाठवले आहे. मागील महिन्यात त्यांनी कोकण दौरा केला होता. त्याच पार्श्वभूमीवर ते नाशिक दौऱ्यावर जात आहेत. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे महासंपर्क अभियानाचा भाग म्हणून ६ ते ९ ऑगस्ट असे चार दिवस नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत.

    अमित ठाकरे हे आज ६ ऑगस्ट रोजी नाशिकला येणार असून त्यामध्ये इगतपुरी, सिन्नर आणि नाशिक तालुका येथे भेट देतील. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी नाशिक ग्रामीणच्या निफाड, येवला, नांदगाव, मालेगाव व चांदवड तालुक्यात दौरा करणार आहेत. ८ ऑगस्ट रोजी सटाणा- देवळा, कळवण, दिंडोरी, हरसुल, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तर ९ ऑगस्ट रोजी शहरातील नाशिक शहर, पूर्व नाशिक, मध्य नाशिक, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भेटीगाठी घेणार आहेत.