कोरोना संकटातच अमोल कोल्हे राजीनामा घेऊन आले होते; अजित पवारांचा गौप्यस्फोट

आता विरोधात उभे राहिलेल्यांसाठी पाच वर्षांपूर्वी आपण झटलो. त्यांना निवडून आणले. पण कोरोना आला. या संकटातच "ते" राजीनामा घेऊन माझ्याकडे आले होते, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री पवार यांनी कोल्हे यांच्याबाबत केला.

    पिंपरी : महाविकास आघाडी शिरुर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे तर थेट अजित पवारांवरच निशाणा साधत आहेत. त्यामुळे अजित पवारही कोल्हे यांच्यावर प्रतिहल्ला करीत आहेत. आता विरोधात उभे राहिलेल्यांसाठी पाच वर्षांपूर्वी आपण झटलो. त्यांना निवडून आणले. पण कोरोना आला. या संकटातच “ते” राजीनामा घेऊन माझ्याकडे आले होते, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री पवार यांनी कोल्हे यांच्याबाबत केला.

    तुम्हाला कशासाठी राजीनामा द्यायचा आहे. असे करू नका, असे मी त्यांना मी विचारलेही होते, असे ते म्हणाले. महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भोसरी विधानसभेतील केंद्रप्रमुख, बूथ कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

    ही निवडणुक देशाची असून, गावकी भावकीची नाही. तिचा निकाल आपले भविष्य ठरवतो. विकासात्मक पातळीवर देशाला पुढे नेण्याचे काम या निवडणुकीतून करायचे आहे. त्यासाठी विकासाची दृष्टी असणारा ताकतीचा नेता आपल्या शिरूरमधून संसदेत पाठवायचा आहे. आढळराव हे विकासाचे व्हिजन ठेवणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांना निवडून आणण्याचे काम आपल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी करायचे आहे, असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.

    यावेळी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, कार्याध्यक्ष शाम लांडे, फजल शेख, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, माजी नगरसेवक संजय वाबळे, विक्रांत लांडे, युवकअध्यक्ष शेखर काटे यांच्यासह आदी यावेळी उपस्थित होते.