बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य वाद विकोपाला; रवी राणा म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प यांच्या जागी बच्चू कडूंना बसवा

बच्चू कडू आणि राणा दांपत्य यांच्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला.

    अमरावती : लोकसभा निवडणूकीचे वारे देशभर वाहत आहे. राज्यामध्ये देखील राजकीय नाट्य सुरु असून पक्षप्रवेश आणि बैठकांचे सत्र वाढले आहे. दरम्यान, अमरावती लोकसभा मतदारसंघाची लढत चांगलीच रंगणार आहे. प्रहारचे बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला. त्यानंतर देखील भाजपने नवनीत राणा यांचा भाजप प्रवेश करत त्यांना उमेदवारी दिली. यानंतर बच्चू कडू आणि राणा दांपत्य यांच्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला असून “काही लोक फक्त राजकारण करतात नौटंकी करतात असा प्रहार बच्चू कडू यांना टोला लगावला आहे.

    रवी राणा यांनी बच्चू कडूंवर टीकास्त्र डागलं. यावेळी रवी राणा म्हणाले, “काही लोक फक्त राजकारण करतात नौटंकी करतात. बोलणं फार सोपं आहे. ते आता आंतरराष्ट्रीय नेते झाले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवक्ते झाल्यामुळे ते फार बोलू शकतात. अमेरिकेचे जे राष्ट्रपती होते डोनाल्ड ट्रम्प यांच्या जागी बच्चू कडू यांना बसवलं पाहिजे ते अमेरिकेतून बसून देशावर लक्ष ठेवेल आणि देशाचे भलं होईल,” असा टोला रवी राणा यांनी लगावला आहे.

    पुढे ते म्हणाले, “काही लोक फक्त नौटंकी करण्यासाठी राजकारणात आले आहेत. वेळ आल्यावर बच्चू कडूंना योग्य उत्तर देईल. माझी कुठलीही चौकशी करा मी समोर जायला तयार आहे, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांचं भाकीत खर होईल आणि त्या 3 लाख मतांनी विजयी होतील,” असा दावाही रवी राणा यांनी यावेळी केला.

    काय म्हणाले होते बच्चू कडू?

    प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरुन आणि साडी वाटपावरुन जोरदार टीका केली होती. 2 कोटीच्या गाडीत फिरायचं आणि 17 रुपयाच्या साडीने लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था तोडून टाका, असा टोला त्यांनी लगावला होता. तसेच नवनीत राणा यांना दोन लाखांच्या मतांनी पराभूत करु, वेळप्रसंगी नवनीत राणांचं डिपॉझिट जप्त करु असा इशारा देखील दिला आहे.