
ढोल- ताशा पथकाच्या सरावावरुन घरी येण्यास उशीर झाल्याने आजी व आत्याने ११ वर्षाच्या मुलाला पाईपने मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात मुलाची आत्या व आजीवर बाल संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुणे : ढोल- ताशा पथकाच्या सरावावरुन घरी येण्यास उशीर झाल्याने आजी व आत्याने ११ वर्षाच्या मुलाला पाईपने मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात मुलाची आत्या व आजीवर बाल संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस शिपाई विठ्ठल घुले यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. येरवडा येथील प्रकाशनगरमध्ये मंगळवारी मध्यरात्री घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई विठ्ठल घुले व त्यांचे सहकारी येरवड्यातील प्रकाशनगरमध्ये गस्त घालत होते. तेव्हा एकजण त्यांच्याजवळ आला. त्याने दोन महिला एका लहान मुलाला मारहाण करीत आहेत, अशी माहिती दिली. त्यामुळे घुले व त्यांचे सहकारी महिलेच्या घरी गेले. त्यांनी विचारपूस केली. तेव्हा त्या दोन महिलांनी मोठमोठ्याने शिवीगाळ करुन आमची कोणी तक्रार केली, त्याचे नाव सांगा, अशी विचारणा केली. त्याचवेळी घराजवळ एक मुलगा रडत उभा होता. त्याच्याकडे घुले यांनी विचारपूस केली.
मुलाने सांगितले की, तो ढोल ताशा पथकात वाजवण्यासाठी जातो. त्यामुळे घरी यायला उशीर झाला. त्यामुळे आत्या व आजीने पाईपाने मारहाण केली. त्या नेहमी मारहाण करतात. उपाशी ठेवतात. त्याची आई त्यांच्यासोबत रहात नाही. ती गेवराईला राहते. पप्पा आईकडे जाऊ देत नाही, असेही त्या मुलाने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आत्या व आजीवर गुन्हा नोंद केला. अधिक तपास उपनिरीक्षक शेलार करीत आहेत.