हत्ती गेला…आता वाघ आला…गवा मुक्कामीच ! चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांत भितीचे वातावरण

हजगोळी (ता. चंदगड) येथील मडवळ कोड परिसरात वाघ दिसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन दिवस याच परिसरामध्ये प्रवाशांना व शेतकऱ्यांना वाघाचे दर्शन झाल्याने येथील शेतकरी व प्रवाशांची झोपच उडाली.

    चंदगड : हजगोळी (ता. चंदगड) येथील मडवळ कोड परिसरात वाघ दिसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन दिवस याच परिसरामध्ये प्रवाशांना व शेतकऱ्यांना वाघाचे दर्शन झाल्याने येथील शेतकरी व प्रवाशांची झोपच उडाली. तुडयेचे सरपंच विलास सुतार यांना गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास मडवळ कोंड येथील रस्त्यावर वाघाचे दर्शन झाले. चंदगडवरून रात्री उशिरा येत असताना भररस्त्यात त्यांना वाघ दिसला. दुसऱ्या दिवशी या परिसराला लागून असलेल्या भैरू मुतकेकर यांच्या शेतातील घराजवळ मध्यरात्री एकच्या सुमारास वाघ दिसला. गाडीचा ब्रेक मारावा की वेग वाढवावा हेच त्यांना समजेना.

    परिसरात अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. वन्य प्राण्यांकडून सतत पिकांचे नुकसान होत असते, म्हणून येथील शेतकरी रात्रीच्या वेळी पिकांच्या राखणीसाठी शेतात जात असतात. ज्या ठिकाणी वाघाचा सध्या वावर आहे, त्याच्याही पुढे घनदाट जंगलाला लागून शेतकऱ्यांच्या काजू बागा आहेत. शेतकऱ्यांना उशिरापर्यंत बागेत रहावे लागते. त्यामुळे काजू उत्पादकांमध्येही भीतीचे सावट पसरले आहे. वन विभागाने ही बाब गांभीर्याने घेऊन वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

    रानटी प्राण्यांचा उपद्रव

    चंदगड तालुक्यात गेल्या काही दिवसांत हत्तीचा वावर सुरू आहे. हत्ती जातो…आणि परत येतो. टस्कर हत्ती नुकताच गेला. मात्र वाघ आला आहे. ततर गव्यांचा कळप मुक्कामीच आहे. या रानटी प्राण्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाचे अधिकाऱी आणि कर्मचारी यांची दमछाक उडत आहे.