
हडपसर भागात मांजरीतील एका गोदामात घरघुती भारत गॅस टाकीतून दुसऱ्या टाकीत बेकायदेशीर गॅस भरताना अचानक स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत दोन कामगार जखमी झाल्याची घटना घडली. याठिकाणी गॅसचा काळाबाजार सुरू असल्याचेही यामुळे उघडकीस आले आहे.
पुणे : हडपसर भागात मांजरीतील एका गोदामात घरघुती भारत गॅस टाकीतून दुसऱ्या टाकीत बेकायदेशीर गॅस भरताना अचानक स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत दोन कामगार जखमी झाल्याची घटना घडली. याठिकाणी गॅसचा काळाबाजार सुरू असल्याचेही यामुळे उघडकीस आले आहे. प्रेम राव शेख (वय ४७, रा. हांडेवाडी, हडपसर) व रमेश रतन कुरुमकर (वय २९, रा. विघ्नहर्ता पार्क, गवळी वस्ती, मांजरी) अशी जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे गोडाऊन सुमित सुनील घुले यांचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, गोडाऊनमध्ये घरगुती भारत गॅसच्या टाकीतून दुसऱ्या टाकीत गॅस भरण्यात येत होता. बेकायदेशीर गॅस भरणा केला जात असताना अचानक स्फोट झाला. त्यावेळी गॅस भरणा करणारे प्रेम व रमेश हे जखमी झाले. स्फोट झाल्याने गोडाऊनला भीषण आग लागली.
दरम्यान, याची माहिती तत्काळ हडपसर पोलीस व अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दल आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत एकापाठोपाठ सहा सिलिंडरचे स्फोट झाल्याने एकच गोंधळ उडाला. स्फोटामुळे आग मोठ्या प्रमाणात भटकली. तर, नागरिकांमध्ये भिती पसरली. जवानांनी काही वेळातच पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. दरम्यान, बेकायदा गॅस सिलिंडरचा साठा करण्यात आल्याचे यावेळी उघडकीस आले आहे. जवानांनी गोदामातील सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बेल्हेकर वस्तीत गॅस सिलिंडर ठेवण्यासाठी बेकायदा गोदाम उभे करण्यात आले होते.