घोसाळकर हत्येसारखीच पुण्यात घटना; व्यवहाराचे पैसे देण्यासाठी बोलावले अन्…

मुंबईतील माजी नगरसेवक तसेच माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकरांच्या हत्येप्रमाणे पुण्यात घटना घडली असून, आर्थिक व्यावहारातून दुकान मालकाला पैसे देण्यास म्हणून बोलवत त्यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली.

  पुणे : मुंबईतील माजी नगरसेवक तसेच माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकरांच्या हत्येप्रमाणे पुण्यात घटना घडली असून, आर्थिक व्यावहारातून दुकान मालकाला पैसे देण्यास म्हणून बोलवत त्यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. त्यानंतर गोळीबार करणाऱ्याने पोलीस ठाण्यात रिक्षाने येत असताना रिक्षातच स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. घटनेने पुण्यात खळबळ उडाली असून, औंध चौकात भरवर्दळीच्या वेळी हा प्रकार घडला.

  अनिल राजाराम ढमाले (वय ३८, रा. बालेवाडी) असे गोळी झाडून आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. तर, अनिलच्या गोळीबारात आकाश गजानन जाधव (वय ४०, रा. बाणेर) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी आकाश यांची पत्नी अनुप्रिया जाधव (वय ३१) यांच्या तक्रारीवरून चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  दरम्यान, आकाश या घटनेत गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल याचा सोन्याचा व्यावसाय होता. त्याचे सराफी दुकान होते. हे दुकान आकाश याचे आहे. तो दुकान (गाळा) अनिल याने भाडे तत्त्वावर घेतले होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यात यानिमित्ताने आर्थिक व्यवहार सुरू होते.

  दरम्यान, अनिल याने आकाश यांना आर्थिक व्यावहरातील पैसे देण्यासाठी म्हणून बालेवाडीमधील ज्युपीटर हॉस्पीटल येथे बोलावले होते. दोघे भेटले. दोघेजण दुचाकीवरून जात होते. आकाश दुचाकी चालवत असताना पाठिमागे बसलेल्या अनिल याने आकाश याच्या डोक्यात गोळी झाडली. दोघेही खाली कोसळल्यानंतर अनिल तेथून पळाला. तो धावत एका रिक्षाजवळ गेला आणि त्याने पोलीस ठाण्याला जाण्यासाठी म्हणून रिक्षा पकडली.

  रिक्षाने तो चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात येण्यासाठी निघाला. औंध चौकात आल्यानंतर चालत्या रिक्षात त्याने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. हा प्रकार होताच रिक्षा चालकाने पोलिसांना याची माहिती कळवली. त्यानंतर चतु:श्रृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. माहिती घेतल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

  दरम्यान, पुण्यात देखील घोसाळकर यांच्या हत्येप्रमाणे घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये आकाश यांची प्रकृती चिंताजनक असून, नातेवाईकांकडून घटनेची माहिती घेतली जात आहे. नेमके आर्थिक व्यवहार कशाचे होते हे मात्र समजू शकलेले नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.