मनमाड शहरातून जाणारा ब्रिटिशकालीन जुना रेल्वे पूल कोसळला; वाहतुकीला होणार आता खोळंबा

मनमाड शहरातून जाणारा इंदूर-पुणे महामार्गावरील ब्रिटिशकालीन जुना रेल्वे पूल बुधवारी मध्यरात्री कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, धुळे-शिर्डी मार्गावरील हाच एक रेल्वेवरील प्रमुख पूल असल्याने वाहतुकीची समस्याच गंभीर होणार आहे.

    नाशिक : मनमाड शहरातून जाणारा इंदूर-पुणे महामार्गावरील ब्रिटिशकालीन जुना रेल्वे पूल (Bridge Collapsed) बुधवारी मध्यरात्री कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र, धुळे-शिर्डी मार्गावरील हाच एक रेल्वेवरील प्रमुख पूल असल्याने वाहतुकीची समस्याच गंभीर होणार आहे.

    पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर इंदूर-पुणे महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला. या मार्गावरील वाहतूक विंचूर प्रकाशा महामार्गावरून वळवल्याने लासलगाव विंचूर महामार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू होती. या ब्रिटिशकालीन पुलाचा मध्यभाग ढासळला आहे. या मार्गावरील पुण्याकडील वाहतूक येवला येथून तर इंदूर येथून येणारी वाहतूक मालेगाव येथून वळवण्यात आली आहे. पण यामुळे मनमाड शहराचे आता दक्षिण-उत्तर असे दोन भाग झाले असून, साधी लहान चारचाकी गाडीही दुसऱ्या भागात जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

    या ब्रिटिशकालीन पुलाची मुदत संपली असल्याने त्याचे संरचनात्मक लेखापरीक्षण झाले होते. मात्र, त्यानंतर कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्यात आली नव्हती. अभियंता संघटनेने वळण रस्त्यासाठी अनेकदा निवेदने देऊन पाठपुरावा केला. पण त्याचाही उपयोग झाला नाही.