रांजणगावात आढळले बेवारस बालक; रांजणगाव पोलिसांकडून बालकाला मायेचा आधार

रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत नवजात बालक आढळून आले. पोलिसांनी या बालकाला मायेचा आधार दिला. अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. तसेच या बालकाची रवानगी भारतीय समाजसेवा केंद्र येथे केली.

  शिक्रापूर : रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत नवजात बालक आढळून आले. पोलिसांनी या बालकाला मायेचा आधार दिला. अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. तसेच या बालकाची रवानगी भारतीय समाजसेवा केंद्र येथे केली.

  रांजणगाव गणपती येथील कैलास दुंडे हे शेळके वस्ती येथील भास्कर लांडे यांच्या शेतात जनावारे चारण्यासाठी गेलेले असताना त्यांना लहान बालकाचा रडण्याचा आवाज आल्याने त्यांनी आजूबाजूला पाहणी केली असता, शेतातील लिंबाच्या झाडाजवळ एक चार ते पाच महिन्याचे बालक बेवारस अवस्थेत दिसून आले. याबाबतची माहिती रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे, पोलीस हवालदार गुलाब येळे, विलास आंबेकर, संदीप जगदाळे, ब्रम्हा पोवार, महिला पोलीस शिपाई मोनिका वाघमारे यांनी घटनास्थळी ठिकाणी धाव घेतली. बालकाला ताब्यात घेऊन त्याच्या  नातेवाईकाचा शोध घेतला परंतु कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

  बालकल्याण समितीकडे बालक सुपूर्द

  त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे यांनी रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे बालकावर उपचार केले. तसेच बालकास महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे, पोलीस हवालदार विलास आंबेकर, महिला पोलीस शिपाई मोनिका वाघमारे यांनी बालकल्याण समिती पुणे येथे हजर करत त्याचे वेदांत असे नामकरण करत बालकास बालकल्याण समितीच्या आदेशाने भारतीय समाजसेवा केंद्र कारेगाव पार्क यांच्या ताब्यात दिले.

  याबाबत कैलास पांडुरंग दुंडे (रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानुसार  पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे या करत आहे.

  महिला पोलिसाच्या डोळ्यात अश्रू तरळले

  बेवारस बालकाला महिला पोलीस शिपाई मोनिका वाघमारे यांची आईच्या मायेची ऊब दिली.  त्याला मायेने जवळ घेवून त्याच्यासोबत हॉस्पिटलमध्ये थांबुन  त्याच्यावर औषोधोपचार केले. बालकच्या रडण्याच्या आवाजाने पोलीस शिपाई मोनिका वाघमारे त्यांच्याही डोळ्यातील अश्रू तरळले. त्यामुळे उपस्थितांनाही गहिवरून आले.