राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा अभूतपूर्व निवडणुकीच्या प्रचाराची अखेर सांगता

राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी अभूतपूर्व लढाई असलेली लोकसभा निवडणूक (Lok Sabha) यंदा अनुभवायला मिळत असून, संपूर्ण महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील बारामती व शिरुरमध्ये या दोन पक्षांमध्ये लढत होत आहे. बारामतीत आज सभांचा धुरळा उडाला. प्रचाराची सायंकाळी सांगता झाली.

  पुणे / दीपक मुनोत : राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी अभूतपूर्व लढाई असलेली लोकसभा निवडणूक (Lok Sabha) यंदा अनुभवायला मिळत असून, संपूर्ण महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील बारामती व शिरुरमध्ये या दोन पक्षांमध्ये लढत होत आहे. बारामतीत आज सभांचा धुरळा उडाला. प्रचाराची सायंकाळी सांगता झाली.

  बारामती लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. बारामती मतदारसंघातून महाआघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत होत आहे. एकाच कुटुंबातील महिला उमेदवार असल्या, तरी ही लढाई शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातच होत असल्याचे दिसून येत आहे. दोघांचीही प्रतिष्ठा पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरुर मतदारसंघामुळे पणाला लागली आहे.

  दरम्यान, आज रविवारी सुटीच्या दिवशी प्रचार सांगता झाली. इतके दिवस रंगात नसलेल्या प्रचाराची गेल्या दोन दिवसांपासून गजबज दिसून येत आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या स्वतःच्या आवाजातील मतदानाचे ध्वनीमुद्रीत आवाहन करणारे मोबाईल कॉल दिवसभरात अनेकदा नागरिकांना आले. स्वतः शरद पवार यांच्या आवाजातील ध्वनीमुद्रीत आवाहन सुध्दा स्मार्ट फोन असलेल्या मतदारांना ऐकविण्यात आले.

  आज सकाळी नऊ वाजता भोरमधील राजा रघुनाथराव हायस्कूल मैदानात तर सकाळी दहा वाजता इंदापूर मार्केट कमिटी येथे शरद पवार यांची सभा झाली. दुपारी एक वाजता शरद पवार यांची प्रचार सांगता सभा मोरगाव रस्ता येथे लेंडी पट्टीच्या मैदानावर झाली. आमदार रोहित पवार यांनी बारामती शहरातून भव्य प्रचारफेरी काढली. तर रणरणत्या उन्हात दुपारी तीन वाजता अजित पवार यांची सांगता सभा मिशन हायस्कूल मैदानावर झाली.

  यावेळी सभेच्या ठिकाणात झाला बदल

  गेली ५० वर्षे मिशन बंगल्याचे मैदान येथे शरद पवार यांच्या प्रचार सभेची सांगता होते. यंदा त्यात खंड पडला ‌आणि मिशन हायस्कूलच्या मैदानावर सभा घेण्याचा हक्क अजित पवार यांनी हिरावून घेतला. पवार कुटुंबीयांचे नाते गेली अनेक वर्षे टिकून होते. गेल्या वर्षी राष्ट्रवादीत फूट पडली आणि बारामतीतच पवार कुटुंबात उभी दरी निर्माण झाली. लोकसभा निवडणुकीत एकाच घरातून एकमेकांविरोधात उमेदवार देण्यापर्यंत ही दरी रुंदावत गेली. त्यामुळे बारामतीची निवडणूक चुलत नणंद आणि भावजय म्हणून सर्वदूर चर्चेत राहिली. बारामतीत यंदा दोन राष्ट्रवादी, दोन सभा आणि दोन पवार, असे चित्र पाहायला मिळाले.

  टोकाची भूमिका घेतल्यानेच…

  पवार कुटुंबातील राजकीय संघर्षामुळे अजित पवार यांच्या मातोश्री बारामती सोडून पुण्यात बहिणीकडे राहायला गेल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळेच आपण त्यांची साथ सोडल्याचे त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी म्हटले आहे.