ऐन थंडीत अवकाळी पावसाने झोडपले; शेतकऱ्यांचा जीव मात्र टांगणीला

ऐन थंडीत अवकाळी पावसाने गेल्या 48 तासांत झोडपून काढल्यानंतर बुधवारी देखील दिवसभर शहरावर ढगाळ वातावरणाचे मळभ दाटले होते. त्यामुळे वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.

    नागपूर : ऐन थंडीत अवकाळी पावसाने गेल्या 48 तासांत झोडपून काढल्यानंतर बुधवारी देखील दिवसभर शहरावर ढगाळ वातावरणाचे मळभ दाटले होते. त्यामुळे वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील काही दिवस ढगाळ वातावरण असेच कायम राहू शकते. गुरुवारी जिल्ह्यासह विभागात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी देखील बरसू शकतात, असा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

    शहराला मंगळवारी दाट धुक्याने वेढले होते. वातावरण बऱ्यापैकी थंड होते, त्यामुळे एकीकडे लोकांनी हिल स्टेशनचा फिल अनुभवला असला तरी बुधवारी यातून अंशतः दिलासा मिळाला. मंगळवारच्या तुलनेत थंडीही कमी झाली. बुधवारी कमाल तापमान 23 अंश, तर किमान तापमान 15 अंशांवर पोहोचले. 30 नोव्हेंबर रोजी कमाल तापमान 25 अंश तर किमान तापमान 14 अंश राहण्याची शक्यता आहे. 1 डिसेंबरपासून तापमानात आणखी वाढ होऊ शकते. 1 रोजी किमान तापमान 15 अंश, 2 डिसेंबर रोजी 16 अंश, 3 डिसेंबर रोजी 17 अंश आणि त्यानंतर 18 अंश राहण्याची शक्यता आहे.

    ढग गायब झाल्यानंतर हवेतील आर्द्रता कमी होऊन रात्रीचे तापमान कमी होईल, तर कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. 30 नोव्हेंबरपासून आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स येणार आहे. त्यामुळे 31 डिसेंबरनंतर थंडी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. या प्रभावामुळे एक-दोन दिवस पाऊस पडू शकतो. डिसेंबरमध्येही वातावरणात चढ-उतार होऊ शकतात, असेही हवामान विभागाचे म्हणणे आहे.