अमरावती मतदारसंघातून माघार घेतलेले आनंदराज आंबेडकर पुन्हा एकदा लोकसभेच्या रींगणात, आनंदराज यांना वंचितचा पाठिंबा

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. अमरावती मतदार संघातून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र याच मतदार संघात आता पुन्हा एकदा एक नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

  लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. अमरावती मतदार संघातून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र याच मतदार संघात आता पुन्हा एकदा एक नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. रिपब्लिन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर हे अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढणार नाहीत,अशी घोषणा करण्यात आली होती. पण त्यांनी माघार घेतल्यानंतर पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे. रिपब्लिन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर हे आगामी लोकसभा निवडणूक अमरावतीमधून लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रींगणात उतरणार आहेत.

  वंचित बहुजन आघडीचा पाठिंबा मला मान्य आहे

  आनंदराज आंबेडकर यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केल्यानंतर त्यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे. आनंदराज यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अमरावती लोकसभा निवडणुकीत अटीतटीचा सामना रंगणार आहे. यावर बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले, मी दोन दिवसांआधी निवडणूक लढणार नाही असे सांगितले होते. पण कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी निवडणूक लढवणार आहे. आंबेडकरी उमेदवार नसल्याने लोकांसमोर मतदान कोणाला करायचं, असा प्रश्न निर्माण झाला होता. म्हणून मी माझी उमेदवारी कायम ठेवत आहे. मी असे जाहीर करतो की पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार आहे. तसेच वंचित बहुजन आघडीने दिलेला पाठिंबा मला मान्य, असे आनंदराज आंबेडकर म्हणाले.

  मी निवडणुकीच्या रींगणातून माघार घेतल्यानंतर अनेकांनी असंतोष व्यक्त केला होता. काही जणांनी तर आत्मदहनाचा इशारा दिला. त्यामुळे सर्व लोकांच्या आग्रहाखातर मी लोकसभा निवडणूक लढणार आहे. इंदू मिलचे काम माझ्यामुळे सुरु झालं. त्यामुळे माझं काम किती आहे हे मला सांगायची काही गरज नाही, असे आनंदराज आंबेडकर म्हणाले.

  आदिवासी नागरिकांसाठी पेस कायद्याची अंमलबजावणी करणार

  आनंदराज आंबेडकर म्हणाले, सध्या संविधान आणि लोकशाही तोडण्याचे काम सुरु आहे. असं कोणीतरी बोलणारा उमेदवार लोकसभा जावा म्हणून मी लोकसभा निवडणुकीच्या रींगणात उतरलो आहे. अमरावतीचे मूळ निवासी आदिवासी बांधवांसोबत जो अन्याय होत आहे, तो मला दूर करायचा आहे. अमरावतीमध्ये महिला खासदार असूनही महिलांची मेळघाटात महिलेची रस्त्यावर प्रसूती होतेय हे दुर्दैव. यासाठी मेळघाटात पेसा कायदाची अंमलबजावणीसाठी मी प्रयत्न करणार, असे आनंदराज आंबेडकर म्हणाले.संविधानचं खरे रक्षक आम्ही आंबेडकरवादीच आहोत, आंबेडकर प्रेमी एक झाले म्हणून माझी उमेदवारी कायम ठेवली, असे देखील आनंदराज आंबेडकर म्हणाले.

  आनंदराज आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. तसेच ते रिपब्लिकन सेना या पक्षाचे प्रमुखदेखील आहेत. आनंदराज आंबेडकर निवडणुकीच्या रींगणात उतरल्याने त्यांच्यासमोर भाजपचे नवनीत राणा आणि प्रहराचे दिनेश बुब हे उमेदवार आहेत.