अन् रिक्षात हरवलेली रक्कम परत मिळाली..! महिलेच्या डोळ्यात आनंद अश्रु ; मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी कर्ज काढून जमवली होती रक्कम

हरवलेली अन् चोरी गेलेली वस्तू सापडत नाही, हा समज आता हळू-हळू पोलिसांनी मोडीत काढण्यास सुरूवात केली आहे. पुणे पोलिसांनी अशाच प्रकारे एका महिलेची रिक्षात विसरलेली दीड लखांची रोकड तब्बल पाच दिवसांनी पुन्हा परत मिळवून दिली आहे. मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी संबंधित महिलेने कर्ज काढून ही रक्कम जमा केली होती.

    पुणे :  हरवलेली अन् चोरी गेलेली वस्तू सापडत नाही, हा समज आता हळू-हळू पोलिसांनी मोडीत काढण्यास सुरूवात केली आहे. पुणे पोलिसांनी अशाच प्रकारे एका महिलेची रिक्षात विसरलेली दीड लखांची रोकड तब्बल पाच दिवसांनी पुन्हा परत मिळवून दिली आहे. मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी संबंधित महिलेने कर्ज काढून ही रक्कम जमा केली होती. त्यातही घटना घडल्याने ती हवालदिल झाली होती. पण, पोलिसांच्या या कामगिरीने ती भारावून गेली अन् भरल्या डोळ्यांनी तिने पुणे पोलिसांचे आभार मानले.

    त्याच झाल असं, एलिझाबेथ रवी (वय ४५, रा. भवानी पेठ) या खासगी नोकरी करतात. त्यांना १२ वर्षाची मुलगी आहे. या मुलीला उपचारासाठी १२ ऑक्टोबरला पुणे स्टेशन परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तिच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. त्या रुग्णालयातून रिक्षाने घरी निघाल्या. पण, घरी आल्यानंतर त्या रिक्षातच बॅग विसरल्या. बॅगेत एक लॅपटॉप आणि मुलीच्या शस्त्रक्रियेकरीता लागणारे दीड लाख रुपये होते.

    हा प्रकार त्यांच्या काही वेळातच लक्षात आला. त्यांनी लागलीच भवानी पेठेत गस्त घालणाऱ्या खडक पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलिसांना माहिती दिली. पोलिस अंमलदाराने वरिष्ठ निरीक्षक सुनील माने यांना घटनेच्या माहिती दिली. माने यांनी गांर्भियाने हा प्रकार घेत तत्काळ तपास करण्याच्या सूचना दिल्या. तपास पथकातील अंमलदार संदीप तळेकर, आशिष चव्हाण, अक्षयकुमार वाबळे व सागर कुडले यांनी महिलेने रिक्षा सोडली त्या परिसरातील ७० सीसीटीव्ही तपासले. त्यात रिक्षा आढळली. रिक्षाच्या नोंदणीक्रमांकावरून रिक्षाचालकाचे नाव, पत्ता आणि मोबाइल क्रमांक मिळवला. त्यानंतर त्याच्याशी संपर्क साधून त्याला मंगळवार पेठेतून ताब्यात घेतले. त्याच्याकडून रिक्षातील लॅपटॉप व दीड लाख रुपये रक्कम असलेली बॅग हस्तगत केली. त्यानंतर पोलिसांनी महिलेला मुद्देमालासह बॅग मिळाल्याचे सांगितले. महिलेला पोलिस ठाण्यात बोलावून बॅग सुपूर्द करण्यात आली.
    महिलेने यावेळी पोलिसांच्या भरल्या डोळ्यांनी आभार मानले. ‘उपचारासाठी कर्ज काढून आणलेली रक्कम गहाळ त्यांना धक्का बसला होता. मात्र, पोलिसांनी संवेदनशीलता दाखवत रक्कम परत मिळवून दिली. यामुळे त्यांनी खडक पोलिसांचे शतशः आभार,’ अशी भावनाही व्यक्त केली.