वाजवी दरात सोने देण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्यास 26 लाखांचा गंडा जत मधील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल; तिघांना अटक

या प्रकरणात पोलीस व राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप; तपास एलसीबी कडे देण्याची मागणी; माजी आमदार विलासराव जगताप

    जत : कस्टमचे सोने देतो असे सांगून आंध्र प्रदेशातील एका सोन्याचे दागिने बनविणाऱ्या कारागिरास २६ लाख ५० हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात अनिल सुतार, द-याप्पा हावीनाळ, मेहबूब जातगार, रमेश कोळी, अमोल कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांपैकी अनिल सुतार, रमेश कोळी, अमोल कुलकर्णी या तिघांना अटक करण्यात आले असून, दोघे फरारी आहेत. तिघांना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, मूळचा पंढरपूर येथील असलेला गणेश विरन्ना कमसल हा कारागीर सध्या कन्नूर (आंध्र प्रदेश) येथे सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय करतो. त्याचे जवळचे नातेवाईक जत शहरात राहतात. या नातेवाईकाच्या मित्राच्या ओळखीने गणेशचा जतमधील सोने विकणाऱ्या टोळीशी संपर्क झाला टोळीने कस्टमचे सोने कमी किमतीत देतो असे सांगून त्यास जतमध्ये बोलाविले. नातेवाइकाच्या मदतीने मोबाइलवरच व्यवहार ठरवला. गणेश २६ लाख ५० हजाराची रक्कम घेऊन दोन दिवसांपूर्वी जतमध्ये आला. या टोळीने गणेशला एमआयडीसीमधील एका कोल्ड स्टोरेजमध्ये बोलविले. गणेश रक्कम घेऊन आपल्या नातेवाइकांसह तिथे पोहोचला. त्याने सोने दाखविण्याची विनंती केली पण आम्हाला बऱ्याच जणांनी गंडवले असून आधी रक्कम दाखवा मग सोने देऊ असे या टोळीने त्यांना सांगितले. गणेश यांनी पैशाची बॅग दाखविल्यानंतर बिस्किटे वितळून तुम्हाला दोन दिवसांत सोने देतो, तोपर्यंत तुम्ही रक्कम घेऊन जावा, असे टोळीने सांगितले. तेवढ्यात या टोळीत सामील असलेल्या एकाने हातातील बॅगेला हिसडा मारून ती ताब्यात घेऊन पलायन केले. त्यानंतर टोळीनेही तेथून पलायन केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गेल्या दोन दिवसांपासून गणेश नातेवाइकांच्या मदतीने आपली रक्कम परत मिळावी यासाठी धडपडत होता. अखेर त्याने पोलिस प्रमुखांकडे तक्रार केल्यानंतर जत पोलिसाना लक्ष द्यावे लागले. अधिक तपास जत पोलिस करत आहेत.

    या प्रकरणात पोलीस व राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप; विलासराव जगताप
    माजी आमदार विलासराव जगताप यांनी या प्रकरणावरती गंभीर आरोप करत अनेक खुलासे केले आहेत. जगताप म्हणाले या प्रकरणांमध्ये पोलीस, काही राजकीय नेते व माजी नगरसेवकांचा हस्तक्षेप आहे. त्यामुळे हा तपास एलसीबी कडे देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच आरोपींची नावे वगळण्यासाठी राजकीय दबाव असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी स्वतः या प्रकरणांमध्ये लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.