
आंध्रप्रदेश येथील गलाई व्यावसायिकाच्या घरात सशस्त्र दरोडा टाकून सोन्याची लूट करणाऱ्या तिघांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. तर नुकतेच या दरोड्यातील मुख्य सूत्रधारास अटक करण्यात आली.
सांगली : आंध्रप्रदेश येथील गलाई व्यावसायिकाच्या घरात सशस्त्र दरोडा टाकून सोन्याची लूट करणाऱ्या तिघांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. तर नुकतेच या दरोड्यातील मुख्य सूत्रधारास अटक करण्यात आली. त्याच्याकडून चार किलो सोने जप्त करण्यात आले आहे. या दरोडाप्रकरणी आतापयर्त चौघांना अटक करून त्यांच्याकडून एकूण 4 कोटी दहा लाखांचे सोने, एक मोपेड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आंध्रप्रदेश येथील टूनूक टाऊन पोलिसांच्या सहकार्याने सांगलीच्या एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
नितीन पांडुरंग जाधव (वय 35, रा. कार्वे, ता. खानापूर, जि. सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यापूर्वी या दरोड्याप्रकरणी गलाई कामगार सूरज बळवंत कुंभार (वय 33, रा. कुर्ली, ता. खानापूर, जि. सांगली), कैलास लालासो शेळके (वय 30, रा. बामणी, ता. खानापूर, जि. सांगली), सादीक ताजुद्दीन शेख (वय 35, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) यांना अटक करण्यात आली आहे. या तिघांकडून 1 कोटी 77 लाखांचे सोने जप्त करण्यात आले होते.
नामदेव देवकर यांचा आंध्रप्रदेशमधील टुनूक येथे गलाईचा व्यवसाय आहे. शिवाय ते सोने तारण व्यवसायही करतात. यातील संशयित गलाई कामगार सूरज कुंभार हा गेल्या चार वषार्पासून त्यांच्या दुकानात काम करत होता. देवकर पत्नीसमवेत घरात असताना कुंभार याने अन्य साथीदारांच्या मदतीने त्यांचे हात-पाय बांधून, त्यांना हत्याराचा धाक दाखवून घरातील तिजोरीतून सोन्याचे दागिने, बिस्कीट, रोख एक लाख रूपये असा ऐवज लंपास केला होता.
आंध्रप्रदेशचे पोलिस उपअधीक्षक सी. सरथ राजकुमार, सर्कल निरीक्षक सी. एच. अंजनेवेलू, सांगली एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सी. एच. व्यंकटेशराव, उपनिरीक्षक डी. आदीनारायण, के. एस. रेड्डी, एस. श्रीधर, एस. के. अकबरलाल, सांगली एलसीबीचे सहायक पोलिस निरीक्षक पंकज पवार, सिकंदर वर्धन, उपनिरीक्षक कुमार पाटील, संदीप गुरव, अमर नरळे, दुर्गा कुमरे, अमर नरळे, शुभांगी मुळीक, ज्योती चव्हाण आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
नितीन जाधव मुख्य सूत्रधार
याप्रकरणी देवकर यांनी टुनूक टाऊन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याच्या तपासासाठी आंध्रप्रदेश पोलिस तपासासाठी सांगलीत आले होते. दोन्ही पोलिसांच्या संयुक्त पथकाने बुधगाव येथील एका ढाब्यासमोर थांबलेल्या कुंभार, शेळके, शेख यांना अटक केली होती. त्यांच्याकडील अधिक चौकशीत नितीन जाधव हा या दरोड्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले.
टुनूक पोलिसांच्या ताब्यात
संयुक्त पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे त्याचा शोध सुरू केला. पथकाला तो विटा-सांगली रस्त्यावरून लिंबकडे मोपेडवरून निघाल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने लिंब येथील जोतिबा मंदिराजवळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या मोपेडची तपासणी घेतल्यानंतर त्यामध्ये चार किलो सोने सापडले. ते जप्त करून त्याला अटक करण्यात आली. त्याला टुनूक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.