उमेदवारी नाकारल्याचा राग; पंकजा मुंडेंच्या चाहत्यांचा केंद्रीय मंत्र्यांच्या ऑफिसवर हल्ल्याचा प्रयत्न

आज दुपारी पंकजा मुंडे समर्थकांनी बीड-उस्मानाबाद सीमेवर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवला. त्यानंतर आता औरंगाबादमध्ये केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयाबाहेर पंकजा मुंडे समर्थक आणि कराड समर्थकांमध्ये तुफान राडा झाला.

    औरंगाबाद : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपने विधानपरिषदेचं तिकीट नाकारलं. त्यामुळे पंकजा मुंडे समर्थक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. भाजपने पंकजा मुंडेंना डावलल्यानंतर त्याचे पडसाद आता राज्यात दिसू लागले आहेत.

    आज दुपारी पंकजा मुंडे समर्थकांनी बीड-उस्मानाबाद सीमेवर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवला. त्यानंतर आता औरंगाबादमध्ये केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयाबाहेर पंकजा मुंडे समर्थक आणि कराड समर्थकांमध्ये तुफान राडा झाला. त्यामुळे पोलिसांनी पंकजा समर्थकाला ताब्यात घेतलं.

    नुकत्याच झालेल्या राज्यसभेची निवडणूक आणि विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारीतून भाजपने पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना हुलकावणी दिली. त्यामुळे पंकजा समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पाहायला मिळत आहे. ज्यादिवशी विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाली त्यादिवशीही पंकजा समर्थकांनी भाजपविरोधात त्यांचा रोष जाहीर केला. मात्र, आता पंकजा समर्थकाने थेट भागवत कराड यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

    पंकजा मुंडे समर्थकाने भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर येऊन आंदोलन करण्याचा आणि त्यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी भागवत कराड यांचेही कार्यकर्ते कार्यालयापुढे जमले होते. त्यांनी पंकजा मुंडेंच्या समर्थकाला मारहाण केली. दरम्यान भागवत कराडांच्या कार्यालयावर आलेल्या पंकजा मुंडे समर्थकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर कराड कार्यकर्त्यांनी कार्यालयापुढे घोषणाबाजी केली.