पत्रकार मारहाणीचे संतप्त पडसाद; कोल्हापूर प्रेस क्लबची निदर्शने, मुरगुडच्या राजेखान जमादारला अटक करण्याची मागणी

शिवसेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी साथीदारांसह भरचौकात अर्वाच्य शिवीगाळ करून फरफटत नेऊन मारहाण केल्याची गंभीर घटना घडली.याचे संतप्त पडसाद जिल्ह्यात सर्वत्र उमटले.

    कोल्हापूर : महिलांकडून झालेल्या मारहाणीबाबत लावलेली बातमी आपल्या विरोधात लावली म्हणून मुरगुड (ता.कागल) येथील पत्रकार प्रकाश तिराळे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी साथीदारांसह भरचौकात अर्वाच्य शिवीगाळ करून फरफटत नेऊन मारहाण केल्याची गंभीर घटना घडली.याचे संतप्त पडसाद जिल्ह्यात सर्वत्र उमटले.कोल्हापूर प्रेस क्लब कोल्हापूरच्या बैठकीत जमादार यांचा तीव्र निषेध करण्यात आला.

    दरम्यान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करतानाही पोलिस ठाण्याबाहेर बेकायदेशीर जमाव जमवून पत्रकारांवर दहशत आणि दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला.त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या राजेखान जमादार यांना तातडीने अटक करा या मागणीसाठी शुक्रवारी कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने दसरा चौकात जोरदार निदर्शने केली.यावेळी जमादार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पत्रकारांनी दसरा चौक दणाणून सोडला.

    ‘माझ्यासंबंधीची बातमी का छापली’ म्हणत राजेखान जमादार व त्यांच्या दोन सहकऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी मुरगुड येथे प्रकाश तिराळे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तिराळे यांच्या तक्रारीवरून जमादार यांच्याविरोधात मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल झाला. मात्र, अद्यापही जमादार यांना अटक न झाल्याने कोल्हापूर प्रेस क्लबच्या सर्वच सभासदांनी याविरोधात आवाज उठवत दसरा चौकात निदर्शने केली. ‘जमादार यांना अटक करा, नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’, अशा घोषणा देत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पत्रकारांनी जमादार यांचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, कार्याध्यक्ष दिलीप भिसे, विश्वास पाटील, सुखदेव गिरी, तानाजी पोवार, समीर मुजावर, लुमाकांत नलवडे,भारत चव्हाण, रणजित माजगावकर,सुनील पाटील,विजय पाटील, राहून जाधव,रवि कुलकर्णी, विश्वास कोरे, संदीप खांडेकर, संतोष मिठारी, सचिन भोसले, संग्राम काटकर, शेखर पाटील, राहुल बामणे, भूषण पाटील, महेश कांबळे,सचीन सावंत यांच्यासह प्रेस क्लबचे सर्व सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.

     प्रेस क्लबचे शिष्टमंडळ मुरगुडात जाणार

    राजेखान जमादार यांची भाषा मग्रुरीची आहे. यापूर्वीही ते अनेक प्रकरणात वादग्रस्त ठरले आहेत.त्यांच्यावर गुन्हा दाखल होतानाही त्यांनी पत्रकारांवर प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्याची ही दहशत मोडून काढण्यासाठी तसेच गुन्हा दाखल होऊनही कारवाई होत नसल्याने कोल्हापूर प्रेस क्लबकडून पूर्ण ताकतीनिशी पत्रकार प्रकाश तिराळे यांच्यामागे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे.यासाठी कोल्हापूर प्रेस क्लबचे शिष्टमंडळ दोन दिवसांत मुरगुड येथे जाऊन तिराळे यांना पाठबळ देणार आहे. शिवाय, दाखल गुन्ह्यावर काय कारवाई झाली याचीही माहिती मुरगुड पोलीस ठाण्यातून घेणार असल्याचे कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी सांगितले. दरम्यान पत्रकारांच्या जीविताला धोका होऊ नये यासाठी शासनाने पत्रकार संरक्षण कायदा केला. या कायद्यांतर्गत आरोपीला सहा महिने जामीन मिळत नाही.तीन वर्षांची आणि त्याहून अधिक शिक्षा तसेच पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षेची तरतूद असलेला पत्रकार संरक्षण कायदा पत्रकारांच्या जीविताचे सरंक्षण करणारा असल्याचे कोल्हापूर प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष व कायदेशीर सल्लागार लुमाकांत नलवडे यांनी यावेळी सांगितले.