अनिल देशमुख, फडणवीस आणि उदय सामंत एकाच हॉटेलमध्ये दाखल; राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटाचे नेते व मंत्री उदय सामंत हे एकाच हॉटेलमध्ये आले होते.

    संभाजीनगर : आज राज्यातील महत्त्वपूर्ण नेत्यांची सभा संभाजीनगरमध्ये होणार आहे. त्यामुळे अनेक नेत्यांची मांदियाळी संभाजीनगर येथे जमली आहे. यामध्ये आता तिन्ही वेगवेगळ्या पक्षातील नेते एकाच हॉटेलमध्ये रहायला आले असल्याची बाब समोर आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटाचे नेते व मंत्री उदय सामंत हे एकाच हॉटेलमध्ये आले होते.

    देवेंद्र फडणवीस, अनिल देशमुख आणि उदय सामंत एकाच हॉटेलमध्ये आल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले होते. त्यांच्यामध्ये भेट झाली असून बैठक देखील पार पडली असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया देत पूर्णविराम लावला आहे. या भेटीबाबत बोलताना अनिल देशमुख म्हणाले, “मी कोणालाही भेटलेलो नाही. एवढं मोठं हॉटेल आहे तर कोणीही येऊ शकतं. देवेंद्र फडणवीस यांना मी कधीही भेटणार नाही. त्यांना भेटण्याची माझी इच्छा देखील नाही,” अशा कडक शब्दांत अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडणार

    शरद पवार यांनी कॉंग्रेसमध्ये आगामी काळामध्ये प्रादेशिक पक्ष सामील होतील असे वक्तव्य केले होते. यावरुन प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख म्हणाले, “सध्या जोरात लढाई सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडणार आहे.  शरद पवार यांनी स्टेटमेंट केले आहे आमचा पक्ष मोठा आहे त्यामुळे ते विलीन होतील असे त्यांचे म्हणणे आहे. राज्यामध्ये अनेक छोटे-मोठे पक्ष आहेत. त्याबद्दल ते बोलले ते राष्ट्रवादी किंवा शिवसेनेबद्दल बोलले नाहीत. राष्ट्रवादीचे दहा पैकी नऊ खासदार निवडून येतील. राष्ट्रवादी बद्दल बोलायचं असतं तर ते स्पष्ट बोलले असते. ज्या अर्थी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये विलीनीकरण कसं शक्य आहे,” अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली.