नवाब मलिकांच्या जामिनानंतर अनिल देशमुख बोलले; म्हणाले महाराष्ट्राचं राजकारण…

  मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना दोन महिन्यांचा जामीन मिळाला आहे. त्यांच्या जामिनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

  सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यामुळे आनंद

  अनिल देशमुख पत्रकार परिषदेद्वारे म्हणाले की, नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाने बेल मंजूर केल्यामुळे सगळ्यांना आनंद आहे. दीड वर्षे मलिक जेलमध्ये होते. सध्या महाराष्ट्रात ज्या प्रकारचं राजकारण सुरुय, ते दुर्दैवी आहे. तपास यंत्रणांचा दुरुपयोग करुन विरोधी पक्षांच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये फसवून कारवाई केली जात आहे.

  महाराष्ट्रात तपास यंत्रणांचा दुरुपयोग

  तपास यंत्रणांचा दुरुपयोग हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर पश्चिम बंगाल, दिल्ली आणि इतर राज्यांमध्येही होत आहे. राजकारणासाठी ईडीच्या चौकश्या लावल्या जातात. परंतु, सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे, असे अनिल देशमुखांनी म्हटले आहे.

  महाविकास आघाडी सत्तेमध्ये असताना मलिक कारागृहात गेले होते. त्यावेळी ते सातत्याने भाजपवर टीका करीत होते. तसेच भाजपने देखील मलिक यांना अनेकदा देशद्रोही म्हटलं होतं.

  अजित पवारांसह मोठा गट सत्तेत

  २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झालं. अजित पवारांनी आमदारांचा मोठा गट घेऊन सत्तापक्षाला समर्थन दिलं. एकीकडे अनिल देशमुख जेलबाहेर आलेले असताना दुसरीकडे नवाब मलिकांचं काय? असा प्रश्न उपस्थित होत होता. शेवटी आज मलिकांनाही जामीन मंजूर झाला.