
राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा राज्यसभा निवडणुकीसाठी केलेला अर्ज फेटाळला आहे. यावर भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे : राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा राज्यसभा निवडणुकीसाठी केलेला अर्ज फेटाळला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी अर्ज केला होता. मात्र, या अर्जाला ईडीने विरोध केला होता. त्यामुळे या दोघांनी सत्र न्यायालयात अर्ज केला असता त्यांनी हा अर्ज हा फेटाळला आहे. या राजकीय घडामोडीवर भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सोमय्या नेमकं काय म्हणाले?
अनिल देशमुख आणि नवाब मालिक यांना राज्यसभा निवडणूक मतदानाचा अधिकार नाकारून न्यायालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बारावी चपराक लगावली आहे, अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
सोमय्या पुढे म्हणाले, ‘दाउदच्या एजंटला मंत्रिमंडळात ठेवणाऱ्या उद्धव ठाकरे सरकारला हायकोर्टाकडूनही दिलासा मिळणार नाही. मेधा सोमय्याने शिवडी कोर्टाने संजय राऊत विरोधात दाखल केलेली याचिका आज न्यायालयाने स्वीकारली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना पुन्हा शंभर कोटीचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी न्यायालयात हजर राहावं लागणार आहे’.
उमेदवारी मिळाली नाही, याची मला जराही खंत नाही
‘राज्यातील १२ कोटी जनतेने माझ्यावर महविकास आघाडी सरकारचा भ्रष्टाचार उघडकीस आणण्याची जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे भाजपकडून मला राज्यसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाली नाही,याची मला जराही खंत नाही, असे किरीट सोमय्या म्हणाले.