शिवसेनेची कोंडी ? एकिकडे बंड दुसरीकडे अनिल परबांची ईडी चौकशी

अनिल परब (Anil Parab) दापोलीमधील रिसाॅर्ट प्रकरणातील (Dapoli Resort Case) कथित मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) ईडीच्या रडारवर आहेत. याच प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीने अनिल परब यांना गेल्या आठवड्यामध्ये चौकशीसाठी समन्स पाठवले होते.

    मुंबई : राज्यात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह अनेक आमदार आणि मंत्री नाराज आहेत. हे सगळे सुरतमध्ये गेले आहेत. एकिकडे पक्षात बंड उफाळून आलेले असताना दुसरीकडे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) दापोली रिसाॅर्ट प्रकरणी (Dapoli Resort Case) ईडी कार्यालयात पोहोचले आहेत. काल ईडीकडून त्यांना चौकशीसाठी (Ed Inquiry) समन्स बजावण्यात आले होते.

    अनिल परब दापोलीमधील रिसाॅर्ट प्रकरणातील कथित मनी लाॅन्ड्रिंग प्रकरणात ईडीच्या रडारवर आहेत. याच प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीने अनिल परब यांना गेल्या आठवड्यामध्ये चौकशीसाठी समन्स पाठवले होते. त्यावेळी अनिल परब यांनी मंत्री असल्याने पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे कळवले होते.

    काही दिवसांपूर्वी अनिल परब आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या संबंधित ठिकाणी ईडीने छापा मारला होता. दरम्यान अनिल परब आज चौकशीला उपस्थित राहणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते समजले जातात. काही दिवसांपूर्वी ईडीने अनिल परब यांच्या खासगी आणि शासकीय निवासस्थानावर छापा मारला होता. त्याशिवाय अंधेरीतील शिवसेना पदाधिकाऱ्याच्या घरीदेखील छापा मारला होता. त्यावेळी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीचे अधिकारी हे १२ तास ठाण मांडून होते.

    दरम्यान आज हे सर्व होत असतानाच अनिल परब यांना नोटीस आली, हे सगळे बारकावे समजून घेतले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

    अनिल परब यांना ईडीने अटक केल्यास मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याआधीच शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अनिल परब हे मुंबई महापालिका निवडणुकीच्यादृष्टीने शिवसेनेचे महत्त्वाचे रणनीतिकार समजले जातात. मुंबईतील वॉर्डमधील समीकरण अनिल परबांना चांगल्याच प्रकारे ठाऊक आहेत. त्यामुळे त्यांना तुरुंगात धाडल्यास शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.