सलग तिसऱ्या दिवशी अनिल परब यांच्या साई रिसॉर्टची झाडाझडती सुरु

सलग तिसऱ्या दिवशी केंद्रीय पर्यावरण विभागाच्या टीमकडून अनिल परब यांच्या साई रिसॉर्टची (Sai Resort Inquiry) झाडाझडती सुरु आहे.

    अनिल परब (Anil Parab) यांच्या कथित रिसॉर्टची केंद्रीय पथकाकडून अद्यापही चौकशी सुरुच आहे. सलग तिसऱ्या दिवशी केंद्रीय पर्यावरण विभागाच्या टीमकडून अनिल परब यांच्या साई रिसॉर्टची (Sai Resort Inquiry) झाडाझडती सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतून पाच अधिकाऱ्यांचं पथक मुरुडमध्ये (Murud) दाखल झालं आहे. त्यांच्याकडून चौकशी सुरु आहे. राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच अनिल परब यांच्या साई रिसॉर्टची पुन्हा यंत्रणेकडून चौकशी सुरू झाली आहे.

    भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या मुरुडमधल्या साई रिसॉर्टनं सीआरझेडचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या रिसॉर्टची चौकशी सुरु करण्यात आली. रत्नागिरीत साई रिसॉर्टमध्ये दाखल झालेली टीम ही रिसॉर्टप्रमाणेच कोच रिसॉर्टचीदेखील चौकशी करत आहे.

    दरम्यान, साई रिसॉर्ट प्रकरणी महत्त्वाची कागदपत्रं मिळवण्यासाठी केंद्राच्या पर्यावरण विभागाची टीम दापोली प्रांत कार्यालयात दाखल झाली. अनिल परब यांच्या साई रिसॉर्टची पाहणी करून केंद्र आणि राज्याची टीम दापोली प्रांत कार्यालयात दाखल झाली. या टीमने दापोली प्रांत अधिकारी यांच्याकडे महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत चौकशी केली. दापोली प्रांत कार्यालयात महत्त्वाच्या माहितीसाठी बराच वेळ अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली.