अण्णाभाऊ साठे महामंडळातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरण : रमेश कदम यांना जामीन; मात्र सुटका नाही

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मागासवर्गीय विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावर असताना निधीमध्ये अपहार केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे बडतर्फ माजी आमदार रमेश कदम यांच्यावर ठेवण्यात आल्यानंतर त्यांना २०१५ रोजी अटक करण्यात आली, तेव्हापासून मागील सात वर्षे कदम कारागृहात आहे.

मयुर फडके, मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील (SLASDC) भ्रष्टाचाराच्या आरोपात (Allegations of Corruption) अटकेत असलेले माजी आमदार रमेश कदम (Former MLA Ramesh Kadam) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (High Court, Mumbai) गुरुवारी जामीन मंजूर केला आहे (Bail is Granted). मात्र अन्य खटले न्यायप्रविष्ट असल्यामुळे जामीन मिळूनही कदम यांना कारागृहातच राहावे लागणार आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मागासवर्गीय विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावर असताना निधीमध्ये अपहार केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे बडतर्फ माजी आमदार रमेश कदम यांच्यावर ठेवण्यात आल्यानंतर त्यांना २०१५ रोजी अटक करण्यात आली, तेव्हापासून मागील सात वर्षे कदम कारागृहात आहे. सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर कदम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

त्यावर प्रदीर्घ सुनावणी पार पडण्यानंतर न्या. अजय गडकरी यांनी राखून ठेवलेला निर्णय़ गुरुवारी जहीर केला आणि कदम यांना १ लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. तसेच सत्र न्यायालयाच्या परवानगीशिवाय मुंबई आणि आसपासचे जिल्हे सोडून न जाण्याचे आणि पोलीस तपासात सहकार्य करण्यासारख्या अटीशर्ती त्यांच्यावर लादण्यात आल्या आहेत.

जामीन मंजूर झाला असला तरी कदम हे साडेसात वर्षांनंतरही तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाहीत. कारण एसएलएएसडीसी घोटाळ्याप्रकरणी नऊ एफआयआर नोंदवण्यात आले नंतर सात प्रकरणे एकत्र करून मुंबई न्यायालयात खटला चालिण्यात आला. अन्य दोन खटले अद्यापही प्रलंबित आहेत.

काय होता कदम यांचा युक्तिवाद

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दंडनीय गुन्ह्याची नोंद करण्याचा आणि तपास करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही. तसेच कदम यांनी साडेसात वर्षांहून अधिक काळ तुरुंगात घालवला आहे. अद्याप खटल्यास सुरुवात झालेली नाही त्यामुळे कदम जामीन मिळण्यास पात्र आहेत असा युक्तिवाद कदम यांच्या वतीने करण्यात आला होता. हाच युक्तिवाद न्यायालयाकडून मान्य करण्यात आला.

काय आहे घोटाळा?

अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळा घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांच्याविरोधात दहिसर येथे गुन्हा दाखल कऱण्यात आणि ऑगस्ट, २०१५ मध्ये कदम यांना अटक करण्यात आली होती. अण्णाभाऊ साठे महामंडळात २५० कोटींचा गैरव्यवहार झाला होता. महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना बोगस लाभार्थी दाखवून रमेश कदमांनी शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप होता. या प्रकरणी रमेश कदमांसह एकूण १२ जणांना अटक करण्यात आली होती.