Pune Drugs Connection

  पुणे : पुण्यातून उघडकीस आलेल्या साडेतीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी पश्चिम बंगालमधील मालदा येथून एकाला ताब्यात घेतले. त्याला लवकरच पुण्यात आणण्यात येणार आहे. हा ड्रग्ज तस्करीतील मास्टरमाईंड संदीप धुणे आणि इतर मुख्य आरोपींच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याला पकडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

  कुरकुंभ एमआयडीसीत सापडला ड्रग्जचा साठा

  सुनील बर्मन असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी सोमवार पेठेत कारवाई करून वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (वय ४०, खडीचे मैदान, सोमवार पेठ) याला आणि त्यानंतर लागलीच अजय अमरनाथ करोसीया (वय ३५, रा. हरकानगर, भवानी पेठ) व हैदर नूर शेख (४०, रा. भैरवनगर, विश्रांतवाडी) यांना पकडले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कुरकुंभ एमआयडीसी येथे भिमाजी परशुराम साबळे (४६,रा. पिंपळे सौदागर, पुणे) याच्या केमिकल कंपनीवर छापा टाकत साब‌ळे आणि युवराज बब्रुवान भुजबळ (४१, रा. डोंबीवली पश्चिम, मुंबई) यांना अटक केली होती.

  आणखी दहा जणांना अटक

  त्यानंतर दिल्ली येथून दिवेश भुतीया (३९), संदीप कुमार (४२, रा. दिल्ली) आणि नाशिक येथून आयुब अकबर मकानदार (रा. सांगली) यांच्यासह दहा जणांना अटक केली. आरोपींकडे केलेल्या तपासातून मंगळवारी पोलिसांनी पश्मिम बंगाल येथून सुनील बर्मन नावाच्या एकाला ताब्यात घेतले. ड्रग्जप्रकरणात मोठा सहभाग आढळल्याने त्याला अटक होण्याचीही शक्यता आहे.

  सर्वात मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

  पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने देशातील सर्वात मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ एमआयडीसी व दिल्ली आणि सांगली येथे छापेमारीकरून तब्बल १६७० किलो ड्रग्ज पकडले. त्यानूसार या साखळीतील आरोपींचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत दहा जणांना पकडले आहे. तर, मास्टर माईंडसह ७ आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, सुनील बर्मन हा ड्रग्जमधील आरोपींच्या व मास्टरमाईंडच्या संपर्कात असल्याचे समोर आल्यानंतर त्याला मालदा येथून पकडण्यात आले आहे.

  दिल्लीवरून विमानाने ड्रग्ज लंडनला..!
  कुरकुंभमधून तयार झालेले ड्रग्ज विश्रांतवाडीत येत होते. तेथून ते टेम्पोने दिल्लीत पाठविले जात होते. तर, दिल्लीतून हे ड्रग्ज विमानाने लंडनला पाठविल्याचे समोर आले आहे. १०-१९ किलोच्या पॅकेटने फुड डिलीव्हरीच्या माध्यामातून मेफेड्रॉन लंडनला पाठविले जात होते. गेल्या २ वर्षापासून हा प्रकार सुरू असल्याचा संशय आहे. विदेशात मेफेड्रॉनच्या विक्रीचे काम मास्टरमाईंड संदिप धुणे याच्याकडे होते. तो नेपाळमार्गे कुवेतकडे फरार झाला आहे. दरम्यान, आयुब मकानदार हा मास्टरमाईंड संदिपचा जुना साथीदार आहे. मकानदार, संदिप धुणे व आणखी एक असे तिघे २०१५ मधील डीआरडीओच्या कारवाईतून अटक केले होते. ते येरवडा कारागृहात होते. दोघे जामीनावर सुटल्यानंतर आरोपींना पुन्हा ड्रग्जचा व्यावसाय सुरू केला.