रेरा प्रकरणातील आणखीन एक इमारत अखेर जमीनदोस्त, केडीएमसीच्या ई प्रभागाची कारवाई

शेजारी निमुळती गल्ली असल्यामुळे व मागील बाजूस चाळ असल्यामुळे हे काम करताना चाळीतील कौलारू घर व पत्रे यांच्यावर मलबा पडल्यामुळे महापालिकेने दोन वेळा चाळ रिकामी करून घेतली.

    कल्याण : रेरा मधील आणखीन एक इमारत अखेर जमीनदोस्त करण्यात आली असून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्या पथकाने ही निष्कासनाची कारवाई केली आहे.

    नांदिवली येथील जागा मालक अशोक म्हात्रे यांच्या तळ अधिक सात या दोन विंग असलेल्या इमारती जमीनदोस्त करण्याचे काम आज संपले आहे. 17 फेब्रुवारी पासून हे काम सुरू करण्यात आले होते. यामध्ये गॅस कटरच्या सहाय्याने दोन्ही विंगचे सर्व स्लॅप कट करण्यात आले तसेच सातवा मजला मॅन्युअली तोडून हाय जॉ क्रशरच्या साहाय्याने इमारत जमीन दोस्त करण्यात आली. ही कारवाई चालू केल्यापासून चार वेळा या ठिकाणी कारवाई बंद करण्यासाठी विरोध झाला.

    शेजारी निमुळती गल्ली असल्यामुळे व मागील बाजूस चाळ असल्यामुळे हे काम करताना चाळीतील कौलारू घर व पत्रे यांच्यावर मलबा पडल्यामुळे महापालिकेने दोन वेळा चाळ रिकामी करून घेतली. ही कारवाई चालू असताना दोन वेळा शट डाऊन इलेक्ट्रिक सप्लाय बंद करण्यात आला तसेच तीन वेळा उप रस्ता बंद करण्यात आला. या कारवाईमुळे धूळ उडू नये म्हणून आरोग्य विभागामार्फत छोट्या टँकरने पाणी मारण्यात आले तसेच प्रायव्हेट टँकरच्या मदतीने पाणी मारण्यात आले असल्याची माहिती केडीएमसी ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी दिली.