नवी मुंबईमध्ये परसले पुन्हा आगीचे लोट; पावणे एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

नवी मुंबई शहरातील पावणे एमआयडीसीमधील कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याचे निदर्शनास आले.

    नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील पावणे एमआयडीसीमधील (Pawane MIDC) कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास केमिकल कंपनीला भीषण आग (Chemical Company Fire) लागल्याचे निदर्शनास आले. यानंतर तातडीने अग्निशमन दलाला (Mumbai Fire brigade) याबाबत माहिती कळवण्यात आली असून, यामागचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही.
    पावणे एमआयडीसी मधील केमिकल कंपनीला गुरुवारी (दि.4) सकाळी सुमारे 6 ते 7 च्या दरम्यान आग लागली. केमिकल कंपनी असल्यामुळे आगीचे स्वरुप भीषण होते. यामध्ये कंपनीचे मोठे नुकसान देखील झाले आहे. घटनेची तीव्रता लक्षात घेत अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या एमआयडीसीमध्ये दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न चालू असून, अद्याप आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही.
    आगीचे आणि धुराचे मोठे लोट परिसरामध्ये परसले असल्यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले. केमिकल कंपनीमध्ये आग लागल्यामुळे ही आग वाढण्याची शक्यता आहे. तसेच आजूबाजूला अनेक आस्थापनांचे कार्यालय असल्यामुळे देखील आग पसरण्याची शक्यता आहे. आगीचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे नवी मुंबई परिसरातील नागरिक अधिक भयभीत झाले आहेत. पावणे एमआयडीसीमध्ये ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, अग्निशमन दल युद्धपातळीवर आग नियंत्रणामध्ये आणण्याचे शर्तीचे प्रयत्न करत आहेत. सुदैवाने आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
    मागील आठवड्यामध्ये देखील नवी मुंबईमध्ये सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला आग लागल्याची घटना घडली होती. यावेळी अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते.