संजीव पलांडेप्रकरणी सीबीआयकडून उत्तर दाखल, वाचा सविस्तर

वाझे देशमुखांना नंबर १ तर परमबीर यांना राजा संबोधित करत असे तसेच सचिन वाझे मुंबईतल्या बार मालकाकडून नंबर १ च्या नावाखाली पैसे वसूल करत होता असा त्याचा जबाब असल्याचे सीबीआयने आपल्या उत्तरात म्हटले आहे.

    मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे(Anil Deshmukh) स्वीय सहायक संजीव पलांडे (Sanjeev palande) यांच्या जामीन अर्जावर सीबीआयकडून (CBI) उत्तर दाखल करण्यात आले आहे. त्यानुसार, सचिन वाझे अनिल देशमुखांना नंबर १ म्हणायचा तर परमबीर सिंगला राजा असे संबोधित करत असल्याचे सीबीआयने दाखल केलेल्या उत्तरात म्हटले आहे.

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी रूपयांच्या वसुलीचा आरोप केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझेसह संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या देशमुखांच्या दोन सहाय्यकांनाही अटक कऱण्यात आली आहे. सचिन वाझे या प्रकरणात साक्षीदार बनलेला आहे. पालांडे यांची सीबीआयने पालांडे आणि शिंदे यांची अनुक्रमे १६ आणि १७ फेब्रुवारी रोजी आर्थर रोड कारागृहात जाऊन चौकशी केली होती. त्यांनतर पालांडे यांनी विशेष सीबीआय न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर बुधवारी सीबीआयकडून उत्तर दाखल करण्यात आले.