कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या काळवीटाचा मृत्यू

शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे काळवीट जखमी अवस्थेत असल्याची माहिती सर्पमित्र साहिल शेख यांनी पर्यावरण विभागाचे अध्यक्ष एम.के.लाकडे यांना दिली. त्यांनी वनविभागाशी या घटनेबाबत संपर्क साधला.

    शेवगाव : शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे काळवीट जखमी अवस्थेत असल्याची माहिती सर्पमित्र साहिल शेख यांनी पर्यावरण विभागाचे अध्यक्ष एम.के.लाकडे यांना दिली. त्यांनी वनविभागाशी या घटनेबाबत संपर्क साधला. वनविभागाने सतर्कता दाखवत डॉक्टरांसह ताबडतोब त्यांची टीम हातगाव येथे पोहोचले. या काळविटाला ताब्यात घेऊन त्यावर उपचार केला. मात्र, जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

    याबाबत मिळालेली माहिती अशी की, हातगाव येथील एका कंपाऊंडमध्ये सायंकाळी काळवीट अडकल्याने त्याच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला. त्यामुळे सदर काळवीट मोठ्या प्रमाणात जखमी झाले होते. ही बाब तेथील ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला पकडले व त्यावर प्रथमोपचार करून प्राणीमित्र साहिल शेख यांना संपर्क केला.

    वनविभागाला या घटनेची माहिती मिळताच वनाधिकार पठाण नौशाद, वनमित्र अनिल आरगडे, प्राणीमित्र सुशांत मनवरे आदी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सदरील काळवीटाला वाचण्याचे प्रयत्न केले. मात्र, यश आले नाही. सदरील घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे व पुढील तपास चालू आहे.