खंडणी विरोधी पथकाची दुहेरी कारवाई; दोन सावकारांना ठोकल्या बेड्या

शहरातील अवैध सावकारीची पाळेमुळे पुणे पोलिसांकडून शोधून काढली जात असून, खंडणी विरोधी पथक दोनच्या पथकाने दुहेरी कारवाई करत हडपसर येथील दोन सावकारांना बेड्या ठोकल्या आहेत. चक्क १५ आणि ८ टक्के व्याजाने त्यांना पैसे देऊन डब्बल पैसे घेतल्यानंतर देखील जादा पैशांसाठी धमकावले जात होते.

    पुणे : शहरातील अवैध सावकारीची पाळेमुळे पुणे पोलिसांकडून शोधून काढली जात असून, खंडणी विरोधी पथक दोनच्या पथकाने दुहेरी कारवाई करत हडपसर येथील दोन सावकारांना बेड्या ठोकल्या आहेत. चक्क १५ आणि ८ टक्के व्याजाने त्यांना पैसे देऊन डब्बल पैसे घेतल्यानंतर देखील जादा पैशांसाठी धमकावले जात होते.

    पहिल्या प्रकरणात झहीर जुल्फीकार सय्यद (वय ४४ रा. माळवाडी, हडपसर) या सावकाराला अटक केली आहे. याबाबत ४४ वर्षीय व्यक्तीने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार आर्थिक अडचणीत होते. त्यांनी झहीरकडून ८ टक्के व्याजाने ५ लाख रूपये घेतले होते. त्याबदल्यात झहीर प्रत्येक महिन्याला ४० हजारांची वसुल करीत होता. ऑगस्ट २०२० ते ऑगस्ट २०२२ कालावधीत दोन वर्षांत त्याने तब्बल १० लाख ४८ हजार वसुल केले होते. परंतु, तरीही तो ३ लाख ४८ हजार रुपये मागत होता. पैसे न दिल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी त्याने दिली होती. यानंतर तक्रारदार यांनी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनकडे तक्रार केली होती. त्याची चौकशी पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे व त्यांचे पथक करत होते. चौकशीत त्याने अवैधरित्या सावकारीकरून पैसे घेतल्याचे समोर आले. त्यानूसार, पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, अमोल पिलाणे व त्यांच्या पथकाने त्याला अटक केली.

    दुसऱ्या प्रकरणात कासिब कदीर कुरेशी (वय ३३ रा. गाडीतळ, हडपसर) या सावकाराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. याबाबत २४ वर्षीय तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तरुणाने कासिब याच्याकडून डिसेंबर २०२० मध्ये साडेसहा लाख रूपये व्याजाने घेतले होते. कासिबने तब्बल १५ टक्के व्याजाने पैसे दिले होते. फेब्रुवारीपर्यंत तरुणाने त्याला ११ लाख ५० हजार रूपये व्याज स्वरूपात दिले होते. परंतु, तरीही कासिब हा १ लाख ७० हजार रुपयांची मागणी करत होता. त्याबाबत तक्रार आल्यानतंर पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, कर्मचारी अमोल पिलाणे, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे व त्यांच्या पथकाने त्याला अटक केली.