ग्रामपंचायत निवडणुकीसाठी  १० लाख ९० हजार मतदार ; जिल्ह्यात १ हजार ८१५ मतदान केंद्र, १० हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सज

    सांगली : जिल्ह्यातील दहा तालुक्यामधील ४१६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि.१८) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. दि.२० डिसेंबर २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहे. जिल्ह्यातील १ हजार ८१५ केंद्रावर १० लाख ९० हजार ४२४ मतदार मतदानाच हक्क बजावतील. मतदान प्रक्रियेसाठी १० हजार २५७ अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

    ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्ह्यात ४४७ ग्रामपंचायतीमध्ये १ हजार ६१४ प्रभाग तर सरपंच पदासह ४ हजार ७१९ सदस्य संख्या आहे. या ग्रामपंचायतीपैकी ३१ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झाले. अनेक ग्रामपंचायतीमधील ५७० सदस्य बिनविरोध झाले आहेत.

    सरपंच पदाच्या ४१६ जागांसाठी १ हजार १२० तर ४ हजार १४६ सदस्य पदांसाठी तब्बल ८ हजार ६०४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यासाठी  एकूण १ हजार ८१५ मतदान केंद्रे असून यामध्ये सर्वसाधारण मतदान केंद्रांची संख्या १ हजार ४६८ असून संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या ३२७ तर अतिसंवेदनशील २० मतदार केंद्रे आहेत. या निवडणुकीसाठी १० लाख ९० हजार ४२४ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ५ लाख ६४ हजार ६०८ पुरूष मतदार, ५ लाख २५ हजार ८०६ स्त्री मतदार तर इतर १० मतदार आहेत. मतदानासाठी आवश्यक असणारी इव्हीएम मशीन सीयू २ हजार ८० तर बीयू ३ हजार १७ आहेत.

    निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेशा प्रमाणात वाहन व्यवस्था व एकूण १० हजार २५७ अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये केंद्राध्यक्ष २ हजार ५०, मतदान अधिकारी-१,  मतदान अधिकारी-२ व मतदान अधिकारी-३ प्रत्येकी २ हजार ५०, मतदान अधिकारी-४ – १३ आणि शिपाई २ हजार ४४ आहेत.  ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीमध्ये मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क निर्भय व नि:पक्षपणे बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. तर दि.२० डिसेंबर २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे.