माण-खटावसाठी प्रभाकर देशमुख यांच्या प्रयत्नातून ७९ सिमेंट बंधारे मंजूर

महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून माण व खटावमधील जनतेसाठी विकासकामे करत असताना माण व खटावमधील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सिमेंट काँक्रीट बंधारे निर्मितीसाठी काही दिवसांपूर्वी जलसंधारण मंत्रालयाकडे प्रस्ताव देण्यात आला होता.

  दहिवडी : महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून माण व खटावमधील जनतेसाठी विकासकामे करत असताना माण व खटावमधील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सिमेंट काँक्रीट बंधारे निर्मितीसाठी काही दिवसांपूर्वी जलसंधारण मंत्रालयाकडे प्रस्ताव देण्यात आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ७९ सिमेंट बंधाऱ्यांच्या कामांना मंजुरी दिली, असे प्रतिपादन प्रभाकर देशमुख यांनी दहिवडी येथील पत्रकार परिषदेमध्ये केले.

  माण-खटावमधील जनतेला दुष्काळमुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असताना पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पुढाकार घेऊन गावोगावी जनजागृती करत चांगल्याप्रकारे पाणी फाऊंडेशनचे काम माण खटावमध्ये करण्यात आले. जलसंधारण सचिव असताना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत माणगंगा नदीसाठी 11 कोटी बाणगंगा नदीसाठी 14 कोटी, वसना नदीसाठी 7 कोटी, येरळा नदीसाठी 9 कोटी असा भरगच्च निधी उपलब्ध करून दिला. त्या माध्यमातून सिमेंट साखळी बंधारे मोठ्या प्रमाणामध्ये उभा राहिल्यामुळे आज नदीकाठी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या विहिरी देखील उन्हाळ्यात पाण्याने भरलेल्या आहेत. त्यामुळे दोन्ही तालुक्यांमध्ये उसाचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना घेता आले.

  पाणलोट विकास योजनेच्या माध्यमातून देखील काही प्रमाणामध्ये पाण्याचा प्रश्न सुटेल. त्यासाठी पाणलोट विकास प्रकल्पाच्या माध्यमातून 170 कोटी निधी उपलब्ध करून दिला. पाणलोट विकास प्रकल्प राबवला गेल्यामुळे माण आणि खटाव दोन्ही तालुक्यांमधील पाण्याची पातळीत कमालीची वाढ झाल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या सर्वेक्षणात निदर्शनास आले. सातारा जिल्ह्यात माण आणि खटाव तालुक्यात पाण्याची पातळी सर्वाधिक असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाने जाहीर केले. येत्या काही दिवसात मान-खटावमधील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न संपवणार असल्याचेही प्रभाकर देशमुख म्हणाले.

  माणसाठी 54 सिमेंट काँक्रीट बंधारे व खटावसाठी 25 सिमेंट काँक्रीट बंधारे मंजूर झाले आहेत. गावनिहाय संख्या पुढीलप्रमाणे…

  माण तालुका…

  बिदाल 2, बिजवडी 2, दानवलेवाडी 2, धामणी 2, जाधव वाडी 2, पिंगळी खुर्द 1, रांजणी 1, सोकासन 2, टाकेवाडी 1, घोडेवाडी 1, शिंदी खुर्द 4, धुळदेव 2, ढाकणी 2, दहिवडी 2, पांगरी 2, मलवडी 4, बिदाल 2, डंगिरेवाडी 1, पळशी 3, इंजबाव 2, मार्डी 5, ढाकणी 1, वडजल 3, नरवणे 5.

  खटाव तालुका…

  सूर्याचीवाडी 3, बनपुरी 3, पिंपरी 4, मरडवाक 3, मोराळे 1, औंध 3, वाकेश्वर 2, तरसवाडी 1, मोराळे 3 गेटेड सिमेंट कॉंक्रीट बंधारे, वाकेश्वर 2.